विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागा
पुणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने काम केले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. विधानसभा निवडणुकीत राज्यात आम्हाला १२ जागा दिल्या जाव्यात यासाठी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) तर्फे तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात रविवार २५ आॅगस्ट रोजी जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठवले पत्रकारांशी बोलत होते.
आठवले पुढे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्रितपणे येऊन अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. संविधानाबाबत जनतेत अनेक गैरसमज पसरवण्यात आले. परंतु एव्हढे सगळे करूनदेखील विरोधकांना त्यात यश आले नाही. ज्या काँग्रेसने एकेकाळी संविधानाची पायमल्ली केली होती, त्याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशभर हातात संविधान घेऊन त्याला वाचवण्याची भाषा करीत होते. मात्र, विरोधकांच्या या विखारी प्रचाराचा काहीही फायदा झाला नाही आणि तिसऱ्यांदा केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले.
आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना सोबत घेऊन काम करीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनात देशात अनेक चांगली कामे होत आहेत. नुकताच कर्मचाऱ्यांच्या पेंशनबाबतचा एक चांगला निर्णय केंद्राने घेतला. याशिवाय केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. याशिवाय पुढील पाच वर्षांत देशातील गरजू नागरिकांना साडेतीन कोटी घऱांचे वाटप केले जाणार आहे. अशाप्रकारे केंद्र सरकार देशभरात अनेक चांगली कामे करणार आहे.
आठवले यांनी पुढे सांगितले की, राज्यात आमच्या पक्षाची ताकद बरीच आहे. विदर्भ-मराठवाडा असो की, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, सगळीकडे आमचे संगठन मजबूत आहे. त्यामुळे या वेळी भाजप-शिवसेनेने आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्यात. राज्यातील सरकार चांगले निर्णय घेत आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीमध्ये लढू. आम्ही ज्यांच्याबरोबर असतो त्यांची सत्ता येतेच, हा आमचा इतिहास आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की, ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी खूपच लाभदायक आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच महायुतीला आगामी निवडणुकीत होईल. मेळाव्यात होणाऱ्या मागण्यांबाबत आठवले म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला महायुतीमध्ये योग्य ती वागणूक मिळाली नाही, हे पूर्णपणे खरे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, यात काही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा भाजप-शिवसेनेने विचार केला पाहिजे. त्यामुळेच आम्ही राज्यात १२ जागांची मागणी करीत आहोत. ही मागणी आमची पूर्ण होईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.
PGB/ML/PGB
25 Aug 2024