राज्यातील १६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर

 राज्यातील १६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्यांच्या वाढत्या झळांबरोबरच आता राज्यासमोरील जलसंकटही रौद्र रूप धारण करू लागले आहे. देशातील सर्वांधिक म्हणजेच १८४५ धरणे असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यावरही आता एप्रिलच्या मध्यावरच पाणी टंचाईचे सावट दिसू लागले आहे. राज्यातील अनेक मोठे, लघू आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीासाठ्यात घट होत आहे. राज्यातील मोठ्या धरणामधील पाणीसाठा रविवारी (ता.१४) ३२.७२ टक्क्यांवर आला असून मध्यम धरणांमध्ये ४०.०७ टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यातील २५९६ लघु प्रकल्पांमध्ये ३१.५४ टक्केच उपयुक्त पाणीसाठी उरला आहे.

दरम्यान सर्वांत कमी उपयुक्त पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उरला असून सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख असणाऱ्या भीमा उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आला आहे. राज्यातील जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व धरणांचा पाणीसाठा हा ३३.५५ टक्के आहे. तर तो गेल्या वर्षी याच दिवशी ४१.७५ टक्के होता. तर सर्व १३८ मोठ्या धरणामधील पाणीसाठा ३२.७२ टक्क्यांवर आला असून तो मागील वर्षी ३९.८२ टक्क्यांवर होता.

वाढत्या उन्हाच्या झळा आणि धरणातील आटणारा पाणीसाठा यामुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील जनतेची चिंता वाढत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर विभागात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यातील ४४ धरणांमध्ये फक्त १७.६१ पाणीसाठी शिल्लक राहीला आहे. लातूर जिल्ह्यातील बिंडगीहाळ, शिवनी, टाकळगाव देवळा या धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे.

तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील ६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाला असून नांदेड जिल्ह्यातील ढालेगाव धरणात पाणीसाठी ०.०० टक्क्यांवर आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील ४ धरणांनी उपयुक्त पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडली असून येथील माजलगाव धरणाने जिल्ह्याची चिंता वाढवली आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठ देखील शून्य टक्क्यांवर आल्याने बीडकरांवर पाणीबाणी आली आहे. तर जायकवाडी धरणातील सध्या पाणीसाठा १५.६२ टक्क्यांवर आहे.

पाणीसाठ्याची विभागनिहाय स्थिती

कोकण : ४६.८६ %

अमरावती : ४६.५१ %

नागपूर : ४४.४४ %

छ. संभाजीनगर : १६.७४%

पुणे : ३१.३९ %

नाशिक : ३४.६४ %

SL/ML/SL

14 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *