H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोघांचा मृत्यू
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. यानंतर आता हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका इन्फ्लूएंझा रुग्णांचा मृत्यू असून देशात आतापर्यंत H3N2 चे 90 रुग्ण आढळून आले आहेत.
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की हा कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा. वृद्ध आणि आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामुळे जास्त अडचणी येण्याची शक्यता आहे.
H3N2 विषाणू इतर इन्फ्लूएंझा विषाणूंपेक्षा जास्त संसर्गजन्य आणि गंभीर लक्षणे निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो.रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाच्या संसर्गासोबतच डोकेदुखी-शरीर दुखणे, सर्दी-खोकला, तीव्र तापाचा त्रास ही लक्षणे आढळून येतात.
SL/KA/SL
10 March 2023