ट्रकचालकांचा देशव्यापी संप मागे
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे देशभरातील ट्रक चालकांच्यात नाराजी पसरली होती. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे यामुळे राज्यभर ट्रक चालकांनी संप पुकारत आपली वाहने आहेत तिथेच लावली होती. त्यामुळे पेट्रोल पंप, वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांना फटका यासह कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर परिणाम झाला होता. पण आता दोन दिवसानंतर यावर तोडगा निघाला असून ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे.
नव्या मोटारवाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला होता. तो संप मागे घेण्यात आला आहे. या नव्या कायद्यामुळे देशात रोषनिर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून यावर मंगळवारी (ता. २ रोजी) स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच हिट अँड रनचा कायदा लगेच लागू केला जाणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी माहिती दिली आहे.
ट्रक चालकांनी संप मागे घ्यावा असे आवाहन सरकारकडून केंद्रीय गृहसचिव यांनी ट्रान्सपोर्ट संघटनांना केले. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले, “आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. नवीन नियम अद्याप लागू झालेला नाहीये. तर जेव्हा हा लागू केल्या जाईल त्याच्याआधी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ.” केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील महाराष्ट्र राज्य चालक-मालक महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच महासंघाने आपला बंद मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील सर्व मालवाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
SL/KA/SL
3 Jan. 2024