सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील सर्व याचिका
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणात आज अदानींना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून, अदाणी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटी तपास नाकारला असून, सेबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. बाजार नियामक सेबीच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार आहेत, जे अदाणी समूहावरील हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करीत आहेत. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही, असा निकाल दिला.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या तपासासंदर्भात सेबीवर लावण्यात आलेल्या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली. त्रयस्थ पक्षाचा अहवाल निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही आणि त्याद्वारे स्थापन केलेल्या पॅनेलमध्ये हितसंबंधांच्या संघर्षाचे कोणतेही प्रकरण नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले. समूहाचे सर्व शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील सर्व याचिका निकाली काढल्या आणि या प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा उर्वरित शेअर बाजार लाल रंगात व्यवहार करत आहे.
अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये दिवसभरातील व्यवहारात 5 टक्क्यांनी वाढ झाली.
अदानी पोर्ट्समध्ये 2 टक्के वाढ दिसून आली. तर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस, हे दोन्ही शेअर्स आज निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत. तर अदानी समूहाचे इतर शेअर्स जसे अदानी विल्मर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स 3 ते 11 टक्क्यांनी वाढले.
SL/KA/SL
3 Jan. 2024