टीव्हीवरच्या जाहिरातींवर TRAI कडून निर्बंध
नवी दिल्ली, दि. २६ : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. ट्रायची ही नियमावली 2012 आणि 2013 मधील जाहिरात नियंत्रण आणि सेवा गुणवत्ता नियमांवर आधारित आहे. यात 10 मिनिटे व्यावसायिक जाहिराती आणि 2 मिनिटे चॅनेलच्या स्वतःच्या प्रचाराला परवानगी आहे. सध्या या मर्यादेला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. असे असले तरी अंतिम निर्णय येईपर्यंत नियम लागू राहील आणि चॅनेल्सना त्याचे पालन करणेच बंधनकारक आहे, असं ट्रायने म्हटलंय. नुकताच 18 नोव्हेंबर 2025 रोजी कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतर ट्रायने बैठक घेऊन हा नियम पुन्हा अधोरेखित केला आहे. यानुसार टीव्ही चॅनेल्सना प्रति तास फक्त 12 मिनिटेच जाहिराती दाखवण्याची मर्यादा कठोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत
ट्रायच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या टीव्ही प्रसारकांना मोठा फटका बसू शकतो. 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जाहिरातींच्या प्रमाणात 10 टक्के घट झाली आहे. चॅनेल्स चालवण्याचा खर्च वाढतोय तर सदस्यता शुल्क आणि जाहिरातीतून येणारे उत्पन्न दोन्ही कमी होतय. डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा वाढलीय. जिथे जाहिरातींवर कोणतीही मर्यादा नाही. हा जुना नियम आजच्या बाजारपेठेशी जुळत नाही आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होईल, असे प्रसारकांचे म्हणणे आहे.