आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्ष प्रारंभ
मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन) : प्रभू रामचंद्रांनी लंका विजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून याला धार्मिक महत्त्वही आहे. वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी सृजनाच्या रंगांमध्ये नाहून निघत असताना वाजतगाजत नववर्षाचा प्रारंभ करणे, भारतीय मनाला रुचते. ध्वजाचे महत्त्व भारतवर्षाला किमान ५,००० वर्षांपासून ठाऊक आहे. त्यामुळे, ‘दुष्ट शक्तींचे निवारण करणारा ध्वज’ गुढीस्वरूपात घरावर लावण्याची आणि त्याच्या मंगल सान्निध्यात नववर्षाचे श्रद्धापूर्ण स्वागत करण्याची पद्धतही सार्थ आहे ! गुढीचे उल्लेख महाराष्ट्राच्या संतवाङ्मयातही आढळतात.
गुढीपाडवा आणि इतिहासातील संदर्भ
महाराष्ट्रातील गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स.७८ ते इ.स.१३०) या सातवाहन राजाने शक राजवटीचा दणदणीत पराभव केला, त्या विजयाची स्मृती म्हणून सध्याची शक कालगणना सुरु झाल्याचे उल्लेख मिळतात. त्या कालगणनेनुसार, आज शके १९४६ ची सुरुवात होत आहे. या संवत्सराचे नाव ‘क्रोधी’ असे असून, चक्राकार आवर्तने करणाऱ्या ६० संवत्सरांपैकी याचा क्रमांक ३८ आहे.
काश्मीरमध्ये एका राजाने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा असल्याचा उल्लेख इतिहासकार अल बिरौनीने केला आहे. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते.
सध्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारली जाते म्हणजे काठी, तांबडे वस्त्र, हार, गोडाची/ साखरगाठींची माळ, कलश अशी गुढी बांधून तिची पूजा करणे- त्या पद्धतीचा सर्वात अलिकडचा उल्लेख एकोणविसाव्या शतकातल्या ‘व्रतशिरोमणी’ या ग्रंथात आलेला दिसतो. त्यात त्या ग्रन्थकाराने महाभारतातल्या चेदी राजाच्या गोष्टीचा संदर्भ देऊन, संरक्षण आणि अनुशासनाचे प्रतीक म्हणून गुढीचा उल्लेख केला आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वीही गुढ्या उभारल्या जात, परंतु त्या केवळ चैत्र शुद्ध प्रतिपदेचा धार्मिक विधी म्हणून उभारल्या जात नसत, तर विजयाचे, स्वागताचे, आनंदाचे द्योतक म्हणून गुढ्या उभारल्या जात. त्या दृष्टीने, नववर्षाच्या स्वागतासाठी आणि विजयी होण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात गुढ्या उभारल्या जाऊ लागल्या, असे म्हणता येईल.
याखेरीज, देशभरात निरनिराळ्या नावांनी हा सण साजरा होतो, किंवा या सुमारास नववर्षाचे, वसंताचे स्वागत होते. त्यापैकी काही उदाहरणे पाहू.
बिहू
आसाममध्ये वसंत ऋतूचे आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रोंगाली बिहू नावाचा उत्सव साजरा करतात. यालाच ‘बोहाग बिहू’ असेही म्हणतात. इतर अनेक भारतीय सणांप्रमाणेच बिहूदेखील कृषीसंस्कृतीशी जोडलेला आहे. आत्ता साजरा होणारा रोंगाली बिहू भाताच्या पेरणीचा उत्सव मानला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास येणारा कोंगाली बिहू हा पीक-संरक्षणाचा आणि वनस्पतींच्या आराधनेचा, तर जानेवारीतील भोगाली बिहू हा कापणीचा उत्सव असतो. एका लोककथेनुसार, बोरदोईसिला (वायव्येकडील वारा/वादळ) ही भूमिकन्या वसंत ऋतूत काही काळासाठी माहेरी येते. त्यामुळे, एकदा जोरदार वारे वाहताच बिहूचा प्रारंभ होतो आणि दुसऱ्यांदा तसे वारे वाहिले की बिहू उत्सवाचा समारोप होतो. सुग्रास भोजन, संगीत आणि नृत्ये करून आसामी लोक रोंगाली बिहूचा आनंद घेतात. घरासमोर उंच खांबावर पितळी, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे लावण्याची- अर्थात गुढी उभारण्याची प्रथा तेथेही दिसते. लहान मुले फुलांचे हार घालून गावात गल्लीबोळात फिरून नववर्षाच्या शुभेच्छा देतात. बिहूच्या निमित्ताने आसामी लोक कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा, तसेच मातृदेवतेचा आणि जननशक्तीचा सन्मान करतात. विशेष बाब म्हणजे, सध्याच्या काळात धर्म-जाती-पंथांच्या बंधनांपलिकडे जाऊन सगळेच आसामी लोक बिहूचा आनंद लुटतात !
युगादी
दक्षिण भारतात आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आज उगादी किंवा युगादी या नावाने हिंदू दिनदर्शिकेतील संवत्सरादी / नववर्षारंभ साजरा होत आहे. या निमित्ताने फुलांच्या रंगीबेरंगी रांगोळ्या (मुग्गू) काढून दारांवर आंब्याच्या पानांची तोरणे बांधून सजावट केली जाते. लोक अभ्यंगस्नान करून देवळात जातात. एकमेकांना नवे कपडे तसेच अन्य भेटवस्तू देतात. गरजूंना दानधर्म करून सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. षड्रसांचा मेळ असलेला ‘पचडी’ हा पारंपरिक पदार्थ घरोघरी खाल्ला जातो. या माध्यमातून, वर्षभर येणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांसाठी मानसिक तयारी होते, अशी कानडी आणि तेलगू भाषिक हिंदूंची श्रद्धा आहे.
साजिबू चिराओबा
मणिपूरमधील मैतेयी लोक आज साजिबू चिराओबा म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस साजरा करत आहेत. यासाठी घरोघरी प्रवेशद्वारावर स्थानिक देवतांच्या पूजनासाठी फुलांची आरास, उदबत्त्यांचा दरवळ आणि एरोंबा, पाकोरा, ऊटी अशा पारंपरिक पक्वान्नांचा नैवेद्य दिसून येतो. शेजारपाजारच्या घरांमधून पदार्थांची देवाणघेवाण होते. सुग्रास भोजनानंतर लोक जवळची टेकडी चढून जाऊन तेथे एकत्रितपणे सण साजरा करतात. पहिल्या दिवशी असे उंचावरील देवतेचे दर्शन घेण्याने नववर्षात प्रगतीच्या पायऱ्या चढून जाता येतात, अशी तेथे श्रद्धा आहे. रात्री सर्वजण एकत्र येऊन ‘थाबाल चोंगबा’ या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतात.
विशू
या सुमारास केरळात विशू साजरा करतात. वर्षाच्या पहिल्या दिवशी, कालपुरुष म्हणून भगवान विष्णूचे किंवा त्याच्या कृष्णावताराचे पूजन करतात. नवे वर्ष यशदायक आणि सुखकारक व्हावे, यासाठी काही शुभसूचक आणि सकारात्मक वस्तूंच्या दर्शनाने विशूच्या दिवसाची सुरुवात करतात. घरातील आबालवृद्ध सर्वांनी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर एका तबकात ठेवलेल्या – तांदूळ, पिवळेधमक लिंबू, सोनपिवळी काकडी, बहावा/अमलताश वृक्षाची फुले, नारळ, फणस, विड्याची पाने, आरसा आदीज्ञ मंगलकारक वस्तूंच्या संचाचे – दर्शन घेण्याची तेथे पद्धत आहे. नारळ, गूळ आणि तांदळापासून केलेल्या पारंपरिक पक्वान्नाने विशू सण साजरा होतो.
पोहेला बैसाख
बंगालमध्येही या सुमारास वर्षारंभ साजरा करतात. अकबराने बंगालमध्ये शेतसारा वसुलीची शिस्तबद्ध व्यवस्था लावण्यासाठी सौर आणि चांद्र कालगणनांचा मिलाफ घडवून आणला आणि तेव्हापासून १४-१५ एप्रिलला नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पडली, असे काही इतिहासकार मानतात. परंतु, सातव्या शतकातील शशांक राजाने बंगाली दिनदर्शिका सुरू केली होती. तसेच आणखीही काही पुराव्यांवरून, ‘बंगाब्द’ हे अकबराच्या पुष्कळ पूर्वीच सुरू झाल्याचे आणि बंगालमध्ये विक्रमादित्याची कालगणना प्रचलित असल्याचे सिद्ध होते. पोहेला बैसाखच्या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी बंगाली स्त्रीपुरूष लाल-पांढऱ्या रंगातील पारंपरिक वेशभूषा करतात. मुली फुलांचे मुकुट घालतात. भात आणि माशाच्या पदार्थांची रेलचेल असते. व्यापारी लोक ‘हाल खाता’ साजरा करत हिशेबाच्या नवीन वह्या सुरू करतात. सकाळी धार्मिक यात्रा निघतात. गावोगावी विशाल वटवृक्षाखाली मोठ्या जत्रा भरतात. तेथे तऱ्हेतऱ्हेच्या बंगाली मिठाया आणि खेळण्यांची विक्री होते.
जागरुकतेची गरज
सध्या समाजमाध्यमांच्या मदतीने एक विचित्र लोण पसरविले जात आहे- ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदूंचा नववर्षारंभ नाहीच’, ‘हे मराठी नववर्ष असले तरी त्यात गुढी हा एका विशिष्ट वर्गाचा अहंकार कुरवाळणारा परंतु वास्तवात अतिशय घृणास्पद प्रकार आहे’… वगैरे गरळ ओकणारे आणि कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा शास्त्राधार नसणारे संदेश पसरवले जाताहेत. आपल्या समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करणारे असे डाव हाणून पाडण्यासाठी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. त्यादृष्टीने आता ठिकठिकाणी होणाऱ्या नववर्ष-
स्वागतयात्रांचे / शोभायात्रांचे महत्त्व मोठे आहे. या यात्रांच्या निमित्ताने आपल्या परंपरांचा गौरव करणारी, आपले भारतीयत्व साजरे करणारी तरुणाई एकत्र येते. रांगोळी, सामूहिक वाद्यवादन, सामूहिक नृत्य अशा आपल्या पारंपरिक कौशल्यांचा जागर होतो. आबालवृद्ध स्री-पुरुष एकत्र येऊन जल्लोष करतात, आनंदाची देवाणघेवाण करून तो शतगुणित तर करतातच, पण या साऱ्यातून ऐक्यभाव वृद्धिंगत होतो.
सामाजिकते विषयी
प्रेम वाढते. ठिकठिकाणी नववर्षाचे औचित्य साधून भजन-कीर्तन-प्रवचन याबरोबरच व्याख्यानांचेही आयोजन होते. पारंपरिक युद्धकलेचे दर्शन घडवणारी शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिकेही सादर केली जातात. तात्पर्य, बुद्धी आणि शक्तीचा परिपोष करणारे मंगल वातावरण जनमानसात रुजवून आपण नव्या वर्षात पाऊल ठेवतो.
त्या मांगल्याचे स्मरण करून सर्व वाचकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! Today Gudhipadwa, Chaitra Shuddha Pratipada, Hindu New Year begins
JW/ML/PGB
10 Apr 2024