वाघांच्या भ्रमणमार्गात येणाऱ्या दोन कोळसा खाणींना स्थगिती…
चंद्रपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील दुर्गापूर ओपनकास्ट आणि साखरी-इरावती या दोन कोळसा खाणींच्या प्रस्तावाला केंद्रीय वन – पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. या दोन्ही खाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्रभ्रमण मार्गात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीसाठी ८०.७७ हेक्टर वनजमीनच्या लीजचे नूतनीकरण आणि साखरी-इरावतीच्या १२.०७ हेक्टर वनजमिनीला परिवर्तित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन – पर्यावरण मंत्रालयाकडे करण्यात आला होता. २७ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीने दुर्गापूर खुली खाण तसेच साखरी-इरावती हे दोन्ही प्रकल्प वाघांचे वास्तव्य असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कागल व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडोर मध्ये येतात. यामुळे या दोन्ही प्रकल्पातील वाघांच्या भ्रमंतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दोन्ही प्रस्तावांना स्थगिती देण्याबाबत भूमिका मांडली.
दुर्गापूर कोळसा खाणीला लीजवर मिळालेली जमीन ताडोबा व्याघ्र प्रकल्पापासून प्रकल्पाला दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडून सल्ला मागवण्यात आला होता. लीज नूतनीकरणाबाबत पत्रव्यवहार सुरू होता. महाराष्ट्र शासनाने दुर्गापूर प्रकल्पाच्या लीजचे नूतनीकरण जून २०२४ मध्ये केले होते. ही वनभूमी दुर्गापूर प्रकल्पाला २००६ मध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. ज्याचा भाडेपट्टा २०१३ मध्ये संपला. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने जमिनीच्या लीजच्या नूतनीकरणासाठी राज्याकडे अर्ज केला होता. तो प्रस्ताव पर्यावरण मंजुरीसाठी केंद्राकडे सादर करण्यात आला होता. तेव्हापासून राज्य सरकारचे वन मंत्रालय आणि डब्ल्यूसीएल यांच्यात नूतनीकरणाबाबत पत्रव्यवहार सुरू होता. अखेर आता केंद्रीय वन – पर्यावरण मंत्रालयानेच स्थगिती दिली आहे.
ML/ML/PGB 8 Jan 2025