५ लाख अपात्र महिलांना वगळले लाडकी बहिण योजनेतून !

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तब्बल ५ लाख अपात्र महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत योजनेंत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा अपात्र महिलांनाही लाभ मिळत असल्याची बाब सरकारने सुरू केलेल्या पडताळणीतून उघड झाली होती. हजारो महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला. इतर सरकारी योजनेतील लाभार्थी महिलाही त्यात घुसल्या होत्या.
संजय गांधी निराधार योजनेतील २ लाख ३० हजार लाभार्थी महिला लाडकी बहिण योजनेचाही लाभ घेत असल्याचे पडताळणीत आढळून आले. २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, अपात्र ठरणाऱ्या सुमारे ५ लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. वय वर्षे ६५ हून अधिक असणाऱ्या १ लाख १० हजार महिलांची नावे देखील योजनेतून हटवण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १ लाख ६० हजार महिलांची नावेही लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
ML/ML/PGB 7 Feb 2025