जोगेश्‍वरीत तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’

 जोगेश्‍वरीत तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मिसळ व बिर्याणी म्हटली की तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलंच…. त्यातच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीच्या चवीचा आस्वाद एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रामध्ये २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.Three days ‘Misal and Biryani Festival’ in Jogeshwari

जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथील शामनगर तलाव येथे हा महोत्सव पार पडणार आहे. याच ठिकाणी पार पडलेल्या या दुहेरी महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादानंतर खवैय्यांसाठी  जोगेश्‍वरीमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मिसळ व बिर्याणी’ हा बहुतांशी जनतेच्या आवडीचा पदार्थ. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीची चवही वेगवेळी असते. परंतु नोकरी धंद्यात व्यस्त असणार्‍या मुंबईकरांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबासह विविध जिल्ह्यांमध्ये मिसळ व बिर्याणीच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी जाता येत नाही.

मागील दोन वर्ष कोविडमुळे बहुतांशी उत्सवांवर बंधने घालण्यात आली होती. परंतु आता कोविडच्या काळातील निर्बंध उठविण्यात आल्याने मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी २ ते ४ डिसेंबर या कालावधीत विधानसभा क्षेत्रात ‘मिसळ व बिर्याणी महोत्सवा’चे आयोजन केले आहे.

इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसर, शामनगर तलाव, जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड परिसर या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबईकरांना महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील मिसळ व बिर्याणीच्या चवीचा मनमुराद आस्वाद एकाच छताखाली घेता येणार आहे.

महोत्सवात स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रविवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते  रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

ML/KA/PGB
21 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *