लवकरच होणार या धुमकेतूचे दर्शन, तेही दुर्बिणीशिवाय

 लवकरच होणार या धुमकेतूचे दर्शन, तेही दुर्बिणीशिवाय

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आकाशातील ग्रहगोलांप्रमाणेच गोलाकार तेजस्वी शिर आणि त्याला जोडून लांबच्या लांब तेजस्वी शेपटीसारखा पिसारा असणाऱ्या धूमकेतू बाबत खगोलप्रेमींना विशेष आकर्षण वाटते.अन्य खगोलांपेक्षा अनोखा आकार हे या उत्सुकतेचे मूळ असले तरीही धूमकेतूचे कित्येंक वर्षांनंतर क्वचितच होणारे दर्शन ही बाबही महत्त्वाची आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात असाच एक दुर्मिळ धूमकेतू आपल्याला पाहता येणार आहे.

C/2023 P1 Nishimura हा धूमकेतू सध्या पृथ्वीपासून दूर आहे. पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ती कक्षा ओलांडत त्याने सूर्याजवळून जाण्यासाठी प्रवास सुरु केला आहे.सध्या खगोलीय दुर्बिणीतून हा धूमकेतू न्याहाळता येत आहे.येत्या ११ सप्टेंबरला तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर असेल आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितीजावर हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही बघता येईल. त्यानंतर पुढील साधारण दोन दिवस त्याचे दर्शन होईल आणि मग दुर्बिणीतूनच त्याला बघता येईल.

या धूमकेतूचा शोध जपानमधील हौशी खगोल अभ्यासक हिदेओ निशिमुरा यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे ११ ऑगस्टला लावला. त्यांनी शोध लावला म्हणून त्यांच्या नावावरुन या धूमकेतूला C/2023 P1 Nishimura असे नाव आता देण्यात आले आहे. तेव्हा आता जगभरातून या नव्या धूमकेतू बद्दल निरिक्षणे सुरु झाली आहेत. याचा नेमका आकार अजुनही समजू शकलेला नाही. सूर्याच्या जवळ जात असल्याने उष्णतेमुळे या धूमकेतूच्या शेपटाचा पसारा आणखी वाढणार आहे.

ग्रहांप्रमाणेच सूर्यमालेचाच सदस्य असलेले धूमकेतू हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार प्रवास करणारे अनेक धूमकेतू असून ते ठराविक कालवधीनंतर सूर्याला वळसा घालत असतात. यापैकी काहीच धूमकेतू हे आत्तापर्यंत माहित झाले असून अनेक धूमकेतू अज्ञात आहेत, काही धूमकेतूंचे अस्तित्व तर सूर्याच्या जवळ जातांनाच लक्षात येते.

धूमकेतूच्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे कारण
धूमकेतूच्या शीराचा गाभा (nucleus) वायू आणि धूळ (silica dust) यांनी बनलेला असतो. प्रदक्षिणा मार्गावरून प्रवास करीत असताना सूर्याच्या दिशेने धूमकेतू जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे सूर्याचे किरण त्यावर पडून वायू आणि धुलिकण तप्त होतात व जोमाने प्रसारानं पावतात. अशा तऱ्हेने एक प्रकारचा वायू आणि धुलिकणांचा ढग तयार होत. यालाच धूमकेतूचा कोमा म्हणतात. गाभा व गाभ्याभोवती तयार झालेला हा कोमा (coma) मिळून धूमकेतूचे शीर तयार होते.

धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्‍या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.

SL/KA/SL

19 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *