परराज्यातील मराठी बोलींचे होणार सर्वेक्षण
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य मराठी भाषा विकास संस्थेने ‘मराठीच्या बोली : एक भाषा वैज्ञानिक अभ्यास’ या नावाने एक प्रकल्प तयार केला. याद्वारे नोकरी, व्यवसाय अशा विविध कारणांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची बोली, त्या बोलींचेी वैशिष्ट्ये, तिच्या त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषांचा झालेला प्रभाव या बाबींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. परराज्यातील मराठी भाषिकांच्या बोलींचे अशा प्रकारचे हे पहिलेच सर्वेक्षण आहे. देशभरात प्रामुख्याने तमिळनाडूतील आरणी शहर, कर्नाटकातील म्हैसूर, गुजरातमधील बडोदा, मध्य प्रदेशातील भोपाळ देवास आणि उत्तर प्रदेशातील बिठूर या शहरांमध्ये असलेल्या मराठी बांधवांच्या बोलींचे हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर यात काही शहर आणि परिसरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकाच काळात देशाच्या निरनिराळ्या भागांत विखुरलेल्या मराठी भाषिकांच्या मराठी बोलींचा तौलनिक अभ्यास केला जाणार आहे. यासाठी त्या-त्या राज्यात भाषिक केंद्रांची निवड केली जाईल. यात कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यातील मराठी भाषिकांचा द्रविड भाषेच्या संपर्कात आलेली केंद्र आणि उत्तर भारतातील हिंदीसह गुजराती भाषांच्या संपर्कातील केंद्र निवडून त्याचे सर्वेक्षण केले जाईल.
सर्वेक्षणासाठी निवडण्यात येणाऱ्या विविध शहरांतील तीन मुख्य जाती समूहातील प्रत्येकी पाच भाषेत मुलाखती घेतल्या जातील.
देशभरात संकलित सामग्रीचे शब्दस्तरीय, व्याकरणिक विश्लेषण तसेच विश्लेषणाची संपर्क भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी केली जाईल, या प्रकल्पाला सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या राज्यांतील मराठी बोलींचा ध्वनी, शब्द, वाक्य आणि पाठ अशा विविध भाषिक स्तरांवरांवरील अभ्यास केला जाणार आहे.
SL/ML/SL
1 May 2024