पाढ्यांचे झाड उपक्रमाने विद्यार्थ्याची गणिताची भीतीच पळाली.

 पाढ्यांचे झाड उपक्रमाने विद्यार्थ्याची गणिताची भीतीच पळाली.

जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उजळणी म्हणजेच पाढे हा विद्यार्थी दशेतला सर्वात महत्त्वाचा घटक.त्यावरच सगळं गणिताचा पाया उभा आहे.त्यामुळे मुलं शाळेत जाऊ लागली,अक्षर ओळख झाली की सुरुवात होते ती उजळणी म्हणजे पाढ्यांची. कित्येक मुलांना ते पाढे पाठ करणं जीवावर येतं,मग छड्या खाऊन,पाठीत धपाटे खाऊन पाढे पाठ करावे लागतात.

अभ्यासाच्या गणिता सोबत आयुष्याच्या गणिताला देखील ते कामी पडतात.
ग्रामीण भागातील मुलांना त्यातही तांडे,वस्त्यांवरील मुलांसाठी हे पाढे म्हणजे मोठे आव्हान असते.
पण तांड्यावर असलेल्या शाळेतील मुलांना पाढे सोपे करून शिकवण्याचा प्रयोग जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेचे उपक्रमशिल शिक्षक सचिन खिल्लारे यांनी केला आणि पहिली ते चौथीच्या मुलांचे २ ते १५२ पर्यंतचे पाढे मुखपाठ झाले.यात ५० च्या पुढे पाढे मुखपाठ असणारे आठ विद्यार्थी आहेत.

काय होतं इथे नेमकं

जिल्हा परिषद शाळां म्हटलं की कुठल्याच सुविधा नसलेली खेड्या पाड्यातील,तांडे वस्ती वरील मुलांची शाळा म्हणून बघितलं जातं.पण आता या जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली असून विविध रंगांच्या पाढे लिहिलेल्या पटट्या,ठोकळे,चित्र या माध्यमातून हसत खेळत शिकवणाऱ्या अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे इथली पोरं भन्नाट हुशार होऊ लागली आहेत.

त्यांचा बुध्यांक वाढू लागला आहे आणि गणिताची भीती दूर दूर पळून गेली आहे. लालवाडी तांडा ता.अंबड इथे पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेत तांड्यावरची २८ मुलं शिक्षण घेत आहेत.या शाळेसाठी चपराशी ते स्वैपाकी ते गुरुजी म्हणून एकटे सचिन खिल्लारे सर सेवा बजावतात आणि सोबतच शाळेत नवनव्या उपक्रमाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आहेत.

त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘पाढ्यांचे झाड’ हा उपक्रम राबविला असून जो विद्यार्थी सर्वात जास्त पाढे पाठ करेल त्याला सत्कार, पारितोषिकासह एक झाडंही दिले जाते.त्या मागचा मुख्य उद्देश हाच की विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जशी भर पडत जाते सोबतच या झाडाची वाढ देखील होतेय.या झाडाकडे बघून विद्यार्थांना आपल्याही ज्ञानात अशीच वाढ व्हावी याची स्फूर्ती मिळावी.

सरांच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागली आणि मुलं गणितात रमली आणि ३०च्या पुढे पाढे पाठ करण्यासाठी पुढाकार घेऊ लागली.
२८ पटसंख्या असलेल्या या शाळेतील ८ विद्यार्थ्यांचे ५० च्या पुढे पाढे पाठ आहेत तर दोघांचे १५२ पर्यतचे पाढे मुखपाठ झालेले आहेत आणि बाकीचे ३० ते ५० पर्यंत तरबेज झाली आहेत.

गुरुजींच्या कामाची दखल

सचिन खिल्लारे यांच्या या उपक्रमांची फाउंडेशनकडून आयोजित नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्डसाठी निवड झाली आहे.शिवाय एससीईआरटी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर ही शाळा सरस ठरली आहे.

शिक्षक सचिन खिल्लारे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या पाढ्यांचे झाड या उपक्रमात १५ मुलांनी बाजी मारली.यात आर्यन राठोड, युवराज मुळे,यश राठोड, पूजा राठोड,पिहू राठोड, रणवीर राठोड.राजवीर राठोड,अंकिता राठोड, अक्षरा चव्हाण,विरेन राठोड,रूद्र राठोड,रोहन चव्हाण,प्रियंका राठोड, अनिकेत राठोड या मुलांचा समावेश असून,त्यांना पाढ्यांचे झाड पारितोषिक म्हणून देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा प्रवास कसा

गणित आणि इंग्रजी विषय मुलांना अवघड वाटतात. परंतु,हेच अवघड विषय अधिकाधिक सोपे करण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘पाढ्यांचे झाड’ हा उपक्रम राबविण्यात आला असून याला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जवळ पास सगळ्या मुलांचे ३० पर्यंतचे पाढे पाठ असून आता त्यांचा प्रवास ५०,१०० ते १५२ पर्यंत पोहचला आहे.पाढे पाठ केल्यामुळे त्यांना मिळालेल्या झाडाची वाढ बघून त्यांनाही आपल्या ज्ञानाची अशीच वाढ व्हावी अशी प्रेरणा मिळावी.आणि शिक्षणाच्या वाटेत त्यांना दुर्दैवाने पुढे अपयशाशी सामना करावा लागला तर या वाढ झालेल्या झाडाकडे बघून त्यांना प्रेरणा मिळावी.

एके काळी आपण अव्वल होतो,आताही आपल्याला अव्वल राहायचे हे त्यांना बळ मिळावे अशी अपेक्षा असल्याचं सचिन खिल्लारे म्हणतात.The student’s fear of mathematics went away with the Padhya’s tree activity.

विद्यार्थ्यांनी मिळवले यश

गेल्या वर्षी या शाळेतील २ मुले नवोदय विद्यालयातील पात्र ठरली असून दरवर्षी ही संख्या वाढावी असा या उपक्रमशील शिक्षकाचा ध्यास आहे.आम्हाला या सोप्या पद्धतीतून पाढे पाठ करता आले त्यामुळे आम्हाला गणिताची भीती वाटतच नाही.जास्तीत जास्त पाढे पाठ करून आम्हाला पाढ्यांचे झाड’ मिळवायचे v अभ्यासात पुढे जायचे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देतात.

सरांच्या या उपक्रमाने शाळेचे आवार लहान मोठ्या वृक्षांनी भरून गेला आहे.त्या झाडांवरील पाट्या विद्यार्थ्याना शिक्षणात उंच झेप घेण्याच बळ देत आहेत.

पाढ्यांच्या झाडाचा उपक्रम पाहण्यासाठी शिक्षणप्रेमीची पावलं आता लालवाडी तांडा शाळेकडे वळू लागली आहेत.हा उपक्रम इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड बनेल यात शंका नाही.

ML/KA/PGB
5 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *