न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये घुमला महाराष्ट्र ढोलचा आवाज

 न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये घुमला महाराष्ट्र ढोलचा आवाज

न्यूयॉर्क, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूयॉर्कच्या इंडिया परेड मध्ये मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोल ताशा पथकाने आपल्या जोमदार सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. १५ ऑगस्ट नंतर येणाऱ्या रविवारी अमेरिकेत भारत दिन ( इंडिया डे ) साजरा करण्याची परंपरा आहे .यंदाच्या ४२ व्या भारत दिनाचे औचित्य साधून न्यूयॉर्कच्या मॅनहटन प्रभागात आयोजित भारताबाहेरील सर्वात मोठा उत्सव उदंड उत्साहात साजरा झाला . यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राममंदिर प्रतिकृतीसह विविध विषयांना गवसणी घालणाऱ्या पन्नासहून अधिक चित्ररथ आणि चाळीस बँड्स चा समावेश होता .

संपूर्ण अमेरिकेतून एक लाखांहून अधिक भारतीय हा उत्सव अनुभवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये जमा झाले होते . रविवारी सकाळी अकरा वाजता सुरु झालेल्या या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या मिरवणूकीची तब्बल सहा तासांनी सांगता झाली . फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांसह प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी , सोनाक्षी सिन्हा , मनोज तिवारी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली .डेट्रॉईट वरून एक हजार किमी अंतर पार करून न्यूयॉर्कला आलेल्या शिलेदार ढोलपथकाचे नेतृत्व मूळ नाशिककर असणाऱ्या प्रणव औंधकरने केले .

प्रणवने ऋतुजा कांबळे , सुरेखा पोकळे , प्रांजली आढाव , साईनाथ जाधव , अमृता पळशीकर , अद्वय पळशीकर, आदित्य दांडेकर, अंकिता दांडेकर, युवान वायकोळे , विहान जोशी , यश घुले , मिहित जोशी , वारूथिनी चौगुले , अथर्व केदार, गुरुनाथ केदार-डोंगरकर ,अर्चना केदार ,आर्यन केदार डोंगरकर आदींच्या समर्थ साथीने साठहून अधिक वादकांसह आसमंत दणाणून सोडला . उपस्थित भारतीयांसह उत्सव बघण्यास आवर्जून आलेले अमेरिकन्स आणि इतर देशांचे प्रेक्षक देखील ” जय भवानी जय शिवराय” च्या घोषणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले . जवळजवळ दीडशे अमेरिकन वाहिन्या तथा शेकडो व्लॅागर्स नी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले.

ML/ML/SL

28 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *