सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

 सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

वर्धा दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुका जवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. राजकीय नेत्यावर सुरु असलेल्या ईडी, सीबीआयचे छापेयापा-यांवरही पडणार आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वर्धा येथे आयोजित महाएल्गार सभेत ते बोलत होते. या महाएल्गार सभेला मोठा जनसागर उसळला होता. त्यामुळे राज्यभर या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या गोटात जाणा-यांबद्दल आंबेडकर म्हणाले की, तुम्ही खुशाल जा. लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण, कुटुंबाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे. मोदी सरकारला आव्हान देताना आंबेडकर म्हणाले, मोदी म्हणत आहेत की, आमच्या 400 जागा निवडून येतील. पण, आजच्या परिस्थितीत 150 जागा निवडून आणून दाखवा. भारत सोडून गेलेल्या नागरिकांची माहिती देखील त्यांनी उघड केली. आंबेडकर म्हणाले, 24 लाख कुटुंबे भारताचे नागरिकत्व सोडून गेली आहेत. ज्यांची स्थावर मालमत्ता 100 कोटींच्या आसपास होती. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन नाहीत. ते सगळे हिंदू आहेत आणि यांचाच प्रचार आहे की, हिंदूचे सरकार आले पाहिजे. मग हे लोक भारत सोडून का गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौफेर फटकेबाजी करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या धाडी घालण्यासाठी राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे. परत मोदी सत्तेत आले, तर तुमचा नंबर आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आता पैसे आणि मतदान करा त्यांना. पण तो जिंकून आला, तर ईडी तुमच्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे मतदान करण्याच्याआधी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

आंबेडकर म्हणाले की, या निवडणुकीत लोकशाहीसह संविधान वाचवलं पाहिजे. यासाठी मतदाराने लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी मी माझं मत भाजपविरोधी टाकणार असं गल्लोगल्ली, चौकाचौकात जाऊन सांगायला पाहिजे, अशी भावनिक सादही त्यांनी जनसमुदायाला घातली.

महाराष्ट्रातच नाहीतर देश पातळीवर सध्या शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्याने सरकारला वेठीस धरले आहे. मात्र, आंबेडकर म्हणाले की, हमीभावाचा कायदा करा असे आमचे म्हणणे आहे. जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण, हे सरकार लालाचं आहे. सामान्य माणसाचं नाही. यामुळे हे सरकार याकडे लक्ष देत नाही. मात्र, ज्या दिवशी सत्ता आपल्या हाती येईल, त्यादिवशी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिले आहे.

ML/KA/SL
19 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *