बारदाना नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीनच्या खरेदीला ब्रेक…
जालना दि ९:– बारदाना उपलब्ध नसल्याने जालन्यात हमीभाव केंद्रावरील सोयाबीनच्या खरेदीला ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतमाल विक्री होण्यासाठी अडचण येत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या 2/3 दिवसांपासून बंद आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागलेले आहेत. 8 दिवसांवर संक्रांत सण येऊन ठेपलाय, पण बारदाना उपलब्ध नसल्याने सोयाबीनची विक्री झाली नाहीये. शेतमाल घरात पडून आहे, अशा परिस्थितीत सण कसा साजरा करावा असा प्रश्न जालन्यातील शेतकऱ्यांना पडलाय. सरकारने तातडीने बारदाना उपलब्ध करून देत सोयाबीनला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. आम्ही शासनाकडे मागील 3 दिवसांपासून बारदाना मागितला आहे, मात्र, अजून पर्यंत बारदाना उपलब्ध झाला नसल्याची तक्रार सोयाबीन हमीभाव केंद्राच्या संचालकांनी बोलून दाखवली. आज बारदाना उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं सोयाबीन हमीभाव केंद्राचे संचालक म्हणाले.