आपला दवाखाना’ मध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये मागील अवघ्या 12 दिवसांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला असून आतापर्यंतच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर पोहोचली आहे.
107 ठिकाणी ‘आपला दवाखाना’
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून सध्या 107 ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत.
ही योजना सुरु झाल्यानंतर प्रारंभी 1 लाख लाभार्थी संख्या 30 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर 1 महिना 7 दिवसांनी म्हणजे 7 जानेवारी 2023 रोजी 2 लाख लाभार्थी टप्पा गाठला गेला. तर त्यापुढे 26 दिवसांनी म्हणजे 3 फेब्रुवारी 2023 रोजी 3 लाखांच्या पार लाभार्थ्यांची संख्या पोहोचली. नंतर 22 फेब्रुवारी 23 रोजी म्हणजे 19 दिवसांत 4 लाख लाभार्थ्यांचा टप्पा पार झाला होता. आता त्याहीपुढे जाऊन मागील अवघ्या 12 दिवसात (23 फेब्रुवारी ते 6 मार्च) 1 लाख नवीन लाभार्थ्यांची भर पडली आहे.
4 लाख 83 हजार रुग्णांची मोफत तपासणी
योजना सुरू झाल्यापासून काल ( 6 मार्च 2023) पर्यंत विचार करता, आपला दवाखाना लाभार्थी संख्या 5 लाख 1 हजार 188 इतकी झाली आहे. यापैकी दवाखान्यांमधून 4 लाख 83 हजार 234 रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे 17 हजार 954 रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
माफकदरात अन्य सुविधा उपलब्ध
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे महापालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.The number of beneficiaries receiving treatment in ‘Apa Dawakhana’ is over 5 lakhs
ML/KA/PGB
8 Mar. 2023