पूर ओसरतोय; मात्र कुजलेल्या पिकांची दुर्गंधी
कोल्हापूर दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुराच्या पाण्यात दहा दिवसांपेक्षा अधिक काळ ऊस, भात, सोयाबीन ही पिकं राहिल्यानं खराब झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी ओसरत असताना या कुजलेल्या पिकांची दुर्गंधी पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे.
इचलकरंजी आणि कुरुंदवाड आगारांतर्गत येणाऱ्या एस.टी.चे नऊ मार्ग अद्याप बंद आहेत.त्याचबरोबर कागल ते कुन्नूर हा मार्गही बंद असल्याने फे-या ठप्प झाल्या आहेत. दिवसभरात जिल्ह्यात १८४ मालमत्तांची पडझड झाली असून त्यात सुमारे 67 लाखांचं नुकसान झाले आहे.
राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला असून, धरणातून प्रतिसेकंद २ हजार ९२८, वारणातून १ हजार ४४५ तर दूधगंगेतून ५ हजार ५५०घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात दोन फुटानं कमी झाली आहे. आज सकाळी सात वाजता पाणी पातळी 32 फुटांवर होती.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं पुराचं पाणी कमी होऊन पाण्याखाली गेलेली पिकं दिसू लागली आहेत. नागदेववाडी ते शिंगणापूरदरम्यान भोगावती नदीच्या पुरातून दहा दिवस पाण्यात राहिलेली पिकं कुजली आहेत. जिल्ह्यात नद्यांच्या पुराचं पाणी ओसरू लागलं असलं तरी कुजलेल्या पिकांची दुर्गंधी परिसरात पसरू लागली आहे.
जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत दिली असली तरी पूर्णपणे उघडीप दिसत नाही. यंदा जुलैपासून पावसाने सुरुवात केली, त्यातही १० जुलैपासून पावसाने गती घेतली. तब्बल वीस दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या
६५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने नद्यांच्या पुराचे पाणी दहा दिवस उतरलं नाही. नदी, छोट्या-मोठ्या ओढ्यांच्या काठावरील ऊस, भात, सोयाबीन पिकं पुराच्या पाण्याखाली राहिल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
तब्बल दहा दिवसांनंतर हळूहळू पिकं पाण्यातून वर दिसू लागली आहेत. यामध्ये भात,सोयाबीन ही पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. उसाच्या शेंड्यात माती आणि गढूळ पाणी साचल्यानं कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुराचं पाणी कमी होत असताना कुजलेल्या पिकांची दुर्गंधी पसरली आहे.
ML/ ML/ SL
8 August 2024