पिंपरी चिंचवड ते पुणे या शहरांदरम्यान धावली पहिल्यांदा मेट्रो ट्रेन

 पिंपरी चिंचवड ते पुणे या शहरांदरम्यान धावली पहिल्यांदा मेट्रो ट्रेन

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (७ किमी) आणि वनाझ ते गरवारे (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी मा. पंतप्रधान यांचे हस्ते होऊन तो प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला.

आजमितीस पुणे मेट्रोचे ८५% काम पूर्ण झाले असून उर्वरित २१ किमी मार्गाची कामे जोमाने सुरु आहेत. काही महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येतील. नुकतेच पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रेंजहिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक अश्या चाचण्या पूर्ण केल्या.

आज मेट्रोने फुगेवाडी स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १०.३० वा. सुरु केली. दापोडी स्थानक, बोपोडी स्थानक, खडकी स्थानक, रेंजहिल स्थानक आणि शिवाजीनगर स्थानक अशी स्थानके पार करून मेट्रो ट्रेन ११.१५ वा. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथे पोहचली. या चाचणीसाठी ४५ मिनिटे वेळ लागला. तसेच दुसरी चाचणी सकाळी ११.२० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) येथून सुरु झाली. आणि वनाझ (उन्नत स्थानक) येथे ११.४५ वा. पूर्ण झाली या चाचणीसाठी २५ मी. वेळ लागला.

या दोन्ही चाचण्या नियोजित उद्दिष्टानुसार पार पडल्या. एकूण १५ किमी (फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक – ८ किमी आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) – ७ किमी) मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.

आजच्या चाचणीमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे या जुळ्या शहरांमध्ये पहिल्यन्दा मेट्रो धावली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गिकेमुळे हि दोन्ही जुळी शहरे ‘मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम’ द्वारे जोडली जाणार आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावर नागरिक नोकरी किंवा काम-धंद्यासाठी ये-जा करीत असतात. मेट्रो सेवेमुळे जलद आणि सुरक्षित असा शहरी वाहतुकीचा पर्याय या नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ स्थानक या उन्नत मार्गावरील चाचणी पूर्ण झाल्याने येत्या काही महिन्यात हा मार्ग सुरु होऊ शकेल. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर नागरिकांना फायदा होणार आहे. येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते वनाझ स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे.

पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना खडकी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (ना. गोपाल कृष्ण गोखले रस्ता), गरवारे महाविद्यालय, नळ स्टॉप, वनाझ इ. ठिकाणी मेट्रोने जाणे शक्य होणार आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, “आजची फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावरील चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐत्याहसिक घटना आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे हि जुळी शहरे मेट्रोमुळे जोडली जाणार असून येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल.

ML/KA/SL

31 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *