रत्नागिरी हापूसची पहिली पेटी मुंबई बाजारात दाखल
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा कोकणचा राजा हापूस आंब्याने अगदी कमाल केली आहे. ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाका संपून नुकतीच थंडीची चाहूल लागत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून या हंगामातील हापूसची पहिली मुहूर्ताची पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.
तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या रत्नागिरीतील बागेतून हापूस आंब्याची मुहूर्ताची पहिली पेटी काल सायंकाळी वाशी मार्केटला रवाना झाली. ऑक्टोबर महिन्यात हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.
गतवर्षी आंबा हंगाम फारसा चांगला नव्हता. होता. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. या कालावधीत उन्हाचा कडाका पडला असता रुपेश शितप यांच्या रत्नागिरीत शहराजवळील भाटये येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला ऑगस्ट महिन्यात मोहोर आल्याचे लक्षात आले. या झाडाला लवकर पालवी फुटून ती जून झालेली होती. याच कालावधीत पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा कडाका सुरू होता. त्यामुळे झाडाला बसलेल्या ताणामुळे मोहोर आला. पावसाळ्यात मोहोर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदार रुपेश शितप यांनी पावले उचलली.कोकणच्या मुसळधार पावसातही शितप यांनी योग्य काळजी घेत मोहोर नीट राखून आंब्याचे उत्पादन यशस्वी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी केली. बागेतील ते झाड सुमारे ८० ते ९० फूट उंच असल्यामुळे मोहोराच्या सुरक्षिततेसाठी कसरत करावी लागली. मोहोरानंतर फळ तयार होईपर्यंत शितप यांनी काळजी घेतली. सुदैवाने त्यांच्या मेहनतीला यशही आले. मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी फळांची काढणी केली. चार डझनची पेटी म्हणजेच ४८ फळं शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्याकडे पाठवली आहेत.
SL/KA/SL
1 Nov. 2023