या दिग्दर्शकाचा ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने सन्मान
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ’12वी फेल’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र सरकारतर्फे ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर विधू विनोद चोप्रा म्हणाले- माझी जन्मभूमी काश्मीर आणि माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आज मी काश्मीर आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक मिलाफ आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण मला तो महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे. महाराष्ट्र माझी भूमी आहे जिथे मी राहतो, जिथे काम करतो आणि जिथे मला मरायचे आहे! माझा सन्मान केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार.
विधू विनोद चोप्रा फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटने या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – सजा-ए-मौतपासून ते 12वी फेलपर्यंत विधू विनोद चोप्राचा सिनेमा साजरा करताना- राज कपूर स्पेशल कॉन्ट्रिब्युशन अवॉर्ड ही त्यांच्या फिल्ममेकिंगमधील वर्षांची मान्यता आहे.
विधू विनोद चोप्रा यांनी परिंदा, 1942 ए लव्ह स्टोरी, मिशन कश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, पीके, संजू हे लोकप्रिय चित्रपट रसिकांना दिले आहेत. सध्या ते ’12वी फेल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्यांना भरभरून दाद मिळाली. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर 2024 मध्ये ’12वी फेल’लाही पुरस्कार मिळाला होता.
विधू विनोद चोप्रा यांच्या 12वी फेल चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य अभिनेता म्हणून तर मेधा शंकर अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी विक्रांत मॅसीचे खूप कौतुक झाले.हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या ’12वी फेल’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाचे शीर्षकही तसेच राहिले आहे. ज्याने लढा दिला नाही तोच पराभूत हा चित्रपटाचा मुख्य सार आहे. विधू विनोद चोप्राचा हा चित्रपट आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या खऱ्या आयुष्यापासून प्रेरित असला तरी देशातील प्रत्येक गावातील आणि लहान शहरातील तरुणांची ही कथा आहे.
SL/KA/SL
27 Feb. 2024