केंद्र सरकार करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

 केंद्र सरकार करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढल्यामुळे भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले होते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नाबाबत या निर्णयाबाबत फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती देखील फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान कांद्याचा मुद्दा आणखी चिघळला तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी थेट दिल्ली गाठली. याठिकाणी मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कांद्यावरील ४० टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा वाटत असतानाच जपानमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन सूत्रे हलवत हा मुद्दा परस्पर निकाली काढला.

ML/KA/SL

22 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *