सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही

 सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय माझे आंदोलन थांबणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना दिली. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 8 वा दिवस आहे.

सरकारने आरक्षणाविषयी कुठलाही निर्णय घेतला नसल्याने मी आज सायंकाळ पासून पाणी बंद करणार असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे. अर्धवट आरक्षण मी कधीही स्वीकारणार नाही आणि समाजाला सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय मी उपोषण थांबवणार नाही असं देखील त्यांनी म्हटलय.

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठराव झाला की, आरक्षणासाठी थोडासा वेळ द्यावा. पण, हा थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ? हे कुणीच स्पष्ट करुन सांगत नाही. या थोड्याशा वेळात सरकार कसे आरक्षण देणार? कोणकोणती पावले उचलणार? आता सरसकट कुणबी दाखले देण्यास काय अडचण आहे? हे सरकार काहीच स्पष्ट करुन सांगत नाही. अशा पोकळ घोषणांवर हे आंदोलन स्थगित करणार नाही असं देखील जरांगे यांनी म्हटले आहे.

जालन्यातील इंटरनेट बंद करण्यामागे सरकारचे षड्यंत्र आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. आम्ही कधीचेच सरकारला चर्चेला बोलावले आहे. त्यांना कुणीही अडवणार नाही. मात्र, आम्ही बोलावूनही अद्याप चर्चेसाठी कुणी आले नाही असं म्हणत आमचं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा सल्ला देखील जरांगे यांनी सरकारला दिलाय.

ML/KA/SL

1 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *