स्वदेशी ड्रोन काउंटर ‘भार्गवास्त्र’ ची चाचणी यशस्वी

 स्वदेशी ड्रोन काउंटर ‘भार्गवास्त्र’ ची चाचणी यशस्वी

भुवनेश्वर, दि. १४ :

भारतीय लष्कराच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घालणाऱ्या ‘भार्गवास्त्र’ या स्वदेशी काउंटर-ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही प्रणाली सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने विकसित केली असून, ती भविष्यातील ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी प्रभावी उपाय ठरणार आहे. ही अत्याधुनिक प्रणाली ओडिशातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये चाचणीसाठी वापरण्यात आली. भारतीय लष्कराच्या आर्मी एअर डिफेन्स विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या चाचणीवेळी उपस्थित होते. चाचणीदरम्यान भार्गवास्त्रने २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लहान आणि कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनना अचूक लक्ष्य करून नष्ट केले.ही प्रणाली हार्ड किल मोडमध्ये कार्यरत असून, सूक्ष्म रॉकेट्सच्या साहाय्याने लक्ष्याचा वेध घेते. ड्रोन हल्ले आणि अनधिकृत हवाई घुसखोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक ट्रॅकिंग आणि लक्ष्य निर्धारण प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादने विकसित करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात संशोधन व विकास होत आहे. भार्गवास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अधिक बळकटी मिळेल. भविष्यात, शहरी भाग तसेच संवेदनशील ठिकाणी ड्रोनविरोधी संरक्षण मजबूत करण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय लष्कराने ‘भार्गवास्त्र’ पुढील काही महिन्यांत अधिक विस्तृत चाचणी आणि तैनातीसाठी सज्ज करण्याची योजना आखली आहे. ही प्रणाली आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *