मुंबई, दि. 5 (राधिका अघोर) :
भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होतो. आणि त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचा हेतू ही शिक्षकांच्या कार्याचे मो जाणणे, त्यांचा सन्मान करणे हेच आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना- युनेस्को आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी – युनिसेफ अशा संघटना हा दिवस साजरा करतात.
यंदाच्या शिक्षक दिनाची संकल्पना ‘ शिक्षकांच्या मतांचा सन्मान : शिक्षणासाठीच्या नव्या सामाजिक कराराच्या दिशेने प्रवास’ अशी आहे.
शिक्षकांच्या मतांचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे.
आजच्या जगाचा विचार केला, तर आज तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं आपण अत्यंत वेगाने विकसित होत आहोत. अशावेळी जगण्याचा वेग वाढला आहे. कोणाच्याही जगण्यात ठहराव दिसत नाही. मूल्यं, विचार, अभ्यास करुन काही करण्याइतका संयम आणि चिकाटी नाही. अशावेळी, हा वेग आणि केवळ तंत्रज्ञानाच्या मागे जाण्याची सवय, समाजाला कुठे घेऊन जाईल, याची काही शाश्वती नाही. समाज टिकायचा असेल, तर त्याचा पाया मजबूत असणं आवश्यक असतं. आणि शिक्षण नेमके हेच काम करते. म्हणूनच, शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. त्यांचे विचार समाजाला दिशा देतात.
यावर्षीची संकल्पना हेच सांगणारी आहे. मात्र, दुर्दैवाने या noble व्यवसायाविषयीची आस्था आज कमी झाली आहे. जगभरात शिक्षकांची संख्या आणि त्यांचे महत्त्व कमी होत आहे, ही चिंतेची बाब असून हे महत्त्व वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर ला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीला साजरा केला जातो. भारतात शिक्षकाकडे पारंपरिक गुरू या कल्पनेतून बघितले जाते. आणि गुरूचा अर्थ शिक्षकापेक्षा कितीतरी व्यापक आहे, मात्र त्यात व्यवहार अभिप्रेत नसतो.
जागतिक स्तरावर मात्र शिक्षकी पेशाकडे व्यवसाय म्हणून बघितले जाते, आणि त्यात काही गैर ही नाही. इतर व्यवसायांना मिळणारा सन्मान आणि वेतन शिक्षकांना देखील मिळावे, त्यांचे स्थान समाजातल्या मान्यवरांच्या यादीत असावे, असा दृष्टिकोन असणे योग्यच आहे. कारण शिक्षक सर्वात उत्तम असे ज्ञानदानाचे कार्य करत असतात.
आज गुगल गुरू सारखी यांत्रिक साधने शिक्षकांना पर्याय म्हणून वापरली जातात, मात्र अशी साधने आपल्याला माहिती देऊ शकतात, ज्ञान देऊ शकत नाही. ते काम शिक्षकच करत असतात. शिक्षक माणूस घडवतात,
केवळ माहिती नाही, तर आयुष्यातल्या आव्हानांचा सामना कसा करावा हे शिकवतात. अनेक गोष्टींच्या संकल्पना स्पष्ट करतात. समाजाची जडण घडण कशी आहे, ती तशी का आहे, हे सांगतात. केवळ माहिती सुसंस्कृत माणूस घडवू शकत नाही, काय योग्य काय अयोग्य याची पारख करायला शिकवतो आणि कसोटीच्या प्रसंगी योग्य मार्ग निवडण्याचे नैतिक बळ ही देतो.
शिक्षकांचे हे महत्त्व जगभरात मान्य आहे. आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना तसा मोबदला देखील दिला जातो. जेव्हा कोणतीही व्यक्ती महत्वाचे कौशल्यपूर्ण काम करत असते, तेव्हा त्यात तिला संपूर्ण वेळ देता यावा, मनापासून ते काम करावे यासाठी तिच्या आयुष्यातला इतर विवंचना दूर करण्याचा प्रयत्न म्हणून तिला चांगला मोबदला देणे अपेक्षित असते. मात्र भारतात शिक्षकांच्या बाबतीत ही गोष्ट तेवढी लक्षात घेतली जात नाही. विशेषतः अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, शालेय शिक्षकांचे वेतन त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्याच्या तुलनेत अपुरे असते, यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.
आणखी एक आव्हान म्हणजे, शिक्षकांना त्यांच्या शिक्षण कार्याव्यतिरिक्त दिली जाणारी इतर कामे. निवडणुका, जनगणना, आजारांचे सर्वेक्षण असो नाहीतर आणखी काही कामे असोत, शिक्षकांना वेठिला धरले जाते. शिक्षकांना दिली जाणारी ही शिक्षणेतर कामे कमी केली जावीत.
शिक्षकांसमोरचे आणखी एक आव्हान म्हणजे त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला आहे. पूर्वी शिक्षकांबद्दल जो आदर आणि विश्वास मुलांमधे, पालकांमध्ये आणि एकूणच समाजात असायाला हवा, तो आता कमी झालेला दिसतो. त्यामुळे अनेकदा शिक्षकही वेगळे प्रयोग करण्याबद्दल अनास्था दर्शवतात. यामुळेच अनेक ठिकाणी लोक शिक्षकी व्यवसायात येण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे शिक्षक दिनानिमित्त केवळ शुभेच्छा न देता शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग करायला हवा. सर्व शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !
PGB/ML/PGB
5 Oct 2024