रा.मि.म.संघाचा टाटा मिल आंदोलनात इशारा आणि घेराव आंदोलन
मुंबई, दि २५: गेल्या पाच वर्षापासून बंद असलेल्या मुंबईतील एनटीसी मिल मधील कामगारांना नऊ महिन्यापासून पगार देण्यात न आल्याने,कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला पारावार उरलेला नाही,त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटने कडून अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील बंद एनटीसी मिल त्वरित सुरू करा, कामगारांचा नऊ महिन्याचा पगार, तसेच रखडलेली देणी विनाविलंब द्या! या मागण्यां साठी सोमवारी(काल) राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगारांचे दादर येथील टाटा मिलवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
कामगारांच्या उपासमारीतून हे अधिका-यांना घेराव घालण्याचे आंदोलन पुढे आले.त्यात टाटा मिलसह,इंदू क्र ५,पोदार, दिग्विजय या चार एनटीसी गिरण्यांचे कामगार सहभागी झाले होते.
देशातील एनटीसीच्या एकूण २३ गिरण्या लॉकडाऊनचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या, त्याला प्रदीर्घ कालावधी लोटला असला तरी अद्याप या गिरण्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मुंबईतील एनटीसीच्या चार गिरण्यासह देशातील 23 बंद गिरण्यांचा लढा उभारून,अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केंद्र सरकारचे यापूर्वीच लक्ष वेधले आहे.या प्रश्नावर संघटनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने कामगारांना पूर्ण पगार देण्याचा निर्णय देऊनही व्यवस्थापाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.संघटना न्यायालयाच्या बेआदबी विरूध्द न्यायालयात लढत आहे. त्याचबरोबर एन.सी.एल.टी.द्वारे एनटीसी गिरण्या पूर्ववत चालू करण्याचा तसेच कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी न्यायधीकरणाद्वारे संघटनेने लावून धरली आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने अर्धापगार दिला असला तरी गेल्या नऊ महिन्यापासून कामगारांना एकही छदाम दिलेला नाही, त्या मुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. त्यामुळे सर्व कामगारांमध्ये असंतोष पसरुन आल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. आंदोलनात खजिनदार निवृत्ती देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकार सकारात्मक पाऊल जो पर्यंत उचलणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. यापुढे गिरण्यांचा वॉच अँड वॉर्ड हा सिक्युरिटी स्टाफही या आंदोलनात सहभागी ह़ोईल,असेही निवृत्ती देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले.उपाध्यक्ष सुनील बोरकर म्हणाले, संघटनेने आजपर्यंत सामंजास्याचे पाऊल उचलूनही,सरकार बेपर्वाईने वागत असेल तर कामगारांना स्वस्त बसणे अशक्य ठरेल.संघटना या प्रश्नावर उग्र लढ्याचे पाऊल उचलेल! याप्रसंगी उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सेक्रेटरी शिवाजी काळे आदींची भाषणे झाली. संघटन सेक्रेटरी दीपक राणे, प्रकाश भोसले,बबन आसवले आणि एम.पी.पाटील, एन.डी.खेडेकर, सखाराम भणगे,राजू सरमळकर आदींचे याकामी सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.
व्यवस्थापनाने या प्रश्नावर सकारात्मक पाऊल उचलावे असा कालच इशारा दिला आणि आजच टाटा मिल मध्ये अधिका-यांना घेराव घालण्यात आले.हा अधिका-यांना घेराव आंदोलनाचा कार्यक्रम अन्य गिरण्यांमध्येही राबविण्यात येणार आहे.KK/ML/MS