नितेश राणेंवर कठोर कारवाई करा

 नितेश राणेंवर कठोर कारवाई करा

मुंबई, दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे इतर काही नेते सातत्याने राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात वाद निर्माण व्हावा अशी प्रक्षोभक विधाने जाहीरपणे केली जात आहेत. विशेषतः मुस्लीम समाजाला उघड उघड धमकावले जात आहे, त्यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरली जात आहे. रामगिरी महाराज यांनी देखील दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे विधान केले आहे, असे असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत? चिथावणीखोर वक्तव्य करुन सामाजिक शांतता भंग करु पाहणाऱ्या सत्ताधारी आमदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली, याची माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह विभाग व पोलीस प्रशासनाची आहे, जर कोणी कायदा हातात घेऊन उघडपणे धमक्या देत असेल, राज्यातील शांतता भंग करत असेल तर त्याच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली पाहिजे. प्रक्षोभक व चिखवणीखोर विधाने करणारे लोक सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्याने त्यांना अभय दिले जात आहे का? पोलीस सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहेत का ? आमदार नितेश राणे, प्रसाद लाड हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस का घाबरतात ? आमदार नितेश राणेंवर अहमदनगर व सोलापूरमध्येही याच प्रश्नी गुन्हे दाखल केले आहेत मग कारवाई करण्यास पोलीस कशाची वाट पहात आहेत?

आमदार नितेश राणेंसह भाजपच्या लोकांनी मागील सहा महिन्यांत केलेली प्रक्षोभक भाषणे व विधाने यांचे रेकॉर्ड तपासून कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून भाजपा युती सरकारला जाब विचारेल, असा इशारा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. या शिष्टमंडळात माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत, तुषार गायकवाड, माजी नगरसेवक विरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *