एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

 एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

मुंबई दि. ३१ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *