सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने आज न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना परदेशी निधी प्रकरणी मुक्त केले.
प्रबीर आणि न्यूज क्लिकचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी चीनकडून निधी पुरवल्याच्या आरोपावरून अटक केली होती. आज निकाल देताना न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती मेहता यांच्या खंडपीठाने सांगितले – प्रबीर पुरकायस्थ यांची दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक अवैध आहे. त्यांची कोठडीतून सुटका करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, न्यूज क्लिकवर चिनी प्रचाराचा आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्याचा आरोप होता. याशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी अँड सेक्युलॅरिझमसोबत कट रचल्याचा आरोप पुरकायस्थ यांच्यावर आहे.
चीनच्या प्रचारासाठी न्यूजक्लिक वेबसाईटला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याच्या आरोपावरून माध्यम विश्वात खळबळ माजली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या न्यूज पोर्टलच्या विरोधात 8,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 (UAPA) अंतर्गत न्यूजक्लिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ हे मुख्य आरोपी, तर अमित चक्रवर्ती याला सरकारी साक्षीदार करण्यात आले आहे. यानंतर, 17 ऑगस्ट 2023 रोजी, न्यूजक्लिक विरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA आणि कलम 153A (दोन समुदायांमधील वैर वाढवणे) आणि 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता पूरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चिट दिल्याने माध्यम विश्वाबद्द्ल निर्माण झालेले संशयाचे धुके काहीसे निवळले आहे असे म्हणता येईल.
SL/ML/SL
15 May 2024