सुबोध भावे आणि रिंकूची ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’

मुंबई, दि. ८ : अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे आणि सैराट फेम रिंकू राजगुरु यांची पडद्यावरील केमिस्ट्री आता सिने रसिकांना पाहता येणार आहे. कॉमेडी थ्रिलर सिनेमा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ज्यामुळे सिनेमाची आणखीनच उत्सुकता वाढली आहे. प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे.
सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या आधी ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीतामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं होतंच, परंतु आता आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे.
दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.” हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
SL/ML/SL