राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता
वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन भारतीय संस्कृतीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणून आपल्या भावाला राख्या बांधतात. बहिणीचे रक्षण करावे तसेच आपल्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे या बद्दल देवाकडे प्रार्थना करतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकोबारायांच्या ओवीप्रमाणे निसर्गातील झाडे देखील आपले आप्तेष्ट असून ते पृथ्वीवर जीवन फुलविण्याचे काम करून आपले रक्षण करतात.
नेमका हाच संदेश वापरून वाशिमच्या श्रीमती मुलीबाई चरखा ईंग्रजी शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावे आणि प्रदुषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. यावेळी प्राचार्य मीना उबगडे , राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी, सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अशोक पऱ्हाड, सहायक वनसंरक्षक राजेंद्र कातखेडे यांच्या मार्गदर्शनात हा आगळावेगळा उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला .
ML/ML/SL
19 August 2024