गोदामात आढळले कोट्यवधीचे बोगस सोयाबीनचे बियाणे ….
बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी मधील दोन गोदामामध्ये राणाजी सीड्स व ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट कंपनीची सुमारे एक कोटी 21 लाख रुपये किमतीचे बोगस आणि बेकायदेशीर रित्या साठवणूक केलेले बियाणे आढळली आहेत. बुलडाणा कृषी विभागाने हा साठा जप्त करून गोडाऊनला सील लावले आहेत तर चौघा जणाविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरामध्ये दोन गोडाऊन मध्ये बेकायदेशीर सोयाबीन चा साठा करून ठेवण्यात आला आहे अशी गोपनीय माहिती बुलढाणा कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कृषी विभागाच्या एका पथकाने या गोडाऊन वर जाऊन पाहणी केली असता या गोडाऊनमध्ये राणाजी सीड्स व ग्रीन गोल्ड सीड्स सोयाबीन असलेल्या बॅगा आढळून आल्या. या बियांना संदर्भातील संबंधित परवाने व संबंधित कागदपत्रे मागितले परंतू संबंधित इसमाने या संदर्भातील कुठलेही कागदपत्रे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली नाहीत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊन मधील प्रत्येकी 25 किलो वजनाचे असलेल्या 2949 बॅग त्याचबरोबर प्रति 70 किलोच्या 269 बॅग, अश्या एकूण 925 क्विंटल सोयाबीन, इलेक्ट्रिक वजन काटे, मशीन व इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 21 लाख 5 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गोडाऊन सील केले आहे.. त्याचबरोबर गणेश सोळंकी, संदीप बाविस्कर, अजित मुळे, मधुकर मुळे या चार जणांवर नियमबाह्य सोयाबीन बियाण्यांचा साठा केल्याप्रकरणी बियाणे निरीक्षक विजय खोंदील यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, बियाणे अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
ML/KA/PGB 2 Jun 2023