आदिशक्ती मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

 आदिशक्ती मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

जळगाव, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा आज आयोजित करण्यात आला असून पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे. २६ जूनला दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल. कालानुरूप पालखी मार्गात तब्बल ४० वर्षांनी बदल करण्यात आला आहे. आडमार्गाचा प्रवास बंद करण्यात आला आहे. यापूर्वी ७१५ किलोमीटर अंतर कापून ३४ दिवसांत पंढरीत दाखल होणारा हा पालखी सोहळा आता ६०० किलोमीटर अंतराचा करून २५ दिवसांत पोहोचणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे अनन्य महत्त्व आहे. राज्यात सर्वाधिक लांब अंतरावरून पायी येणारी ही एकमेव पालखी आहे. यंदा वारीच्या स्थासाठी बैलजोडीचा मान रावेर तालुक्यातील नाचणखेडा येथील राजेश पाटील यांना मिळाला आहे.आज सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र कोथळी मूळ मुक्ताई मंदिरातून मुक्ताई आषाढी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी भक्तची मांदियाळी लागली होती. आज आदिशक्ती मुक्ताई मातेला केळी आणि तुळशीच्या हारांचा आरास करून सजविण्यात आले होते. भजन कीर्तन आणि मृदुंग, टाळ च्या तालावर नाचत वारकरी परंपरेप्रमाणे मुक्ताईनगर मधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच मुक्ताई माता यांच्यासह सर्व भावंडांचा सुरेख देखावा यावेळी तयार करण्यात आला होता. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली असून मोठा उत्साह दिसून आला होता.

ML/KA/PGB 2 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *