लवकरच नौदल गणवेशावर राजमुद्रेने प्रेरित मानचिन्ह

सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या विकासासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेना दिनानिमित्त मालवण येथे बोलताना दिली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या सिंधुधुर्ग किल्ल्याजवळ नौदलाच्या जन्मभूमीत यंदाचा नौसेना दिन साजरा केला जातोय असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. त्याचबरोबर नौदल लवकरच भारतीय परंपरांचा अंगीकार करणार आहे, त्यामुळे नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी जाहीर केले.
भारतीय नौसेनेचा ५२ वा नौसेना स्थापना दिन आज मालवण, तारकर्ली इथं साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रधानमंत्री मोदी बोलत होते. नौदल तळाबाहेर पहिल्यांदाच अन्य ठिकाणी हा नौदल दिन साजरा करण्यात आला. यावेळी नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी चित्तथरारक प्रात्त्यक्षिके नौदलाने सादर केली. यात २० लढाऊ जहाज,मिग-२९
सह ४० लढाऊ विमाने, विक्रमादित्य विमानवाहू नौका सहभागी झाल्या होत्या. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , राज्य मंत्रीमंडळ सदस्य तसेच सिडीएस जनरल अनिल चौहान , नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हावासीय देखील मोठया संख्येने उपस्थित होते.
ML/KA/SL
4 Dec. 2023