.. तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल!

 .. तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल!

मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ आराखड्यानुसार नेण्याची मागणी रेटून धरणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आता या प्रकरणी ठाम पवित्रा घेतला आहे. हा प्रश्न सभागृहात मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी केलं. पण सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे वक्तव्य आ. सत्यजीत तांबे यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमानिमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंबईतील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राही भिडे आदी मान्यवरांसह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी आ. तांबे यांना पुणे-नाशिक मार्गात नेमका का बदल झाला, तसंच सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर तुमची पुढची दिशा काय असेल, याबाबत विचारणा केली.

या मुद्द्यावर आ. तांबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्याच वेळी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग ज्या भागातून जातो, त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून हा मार्ग मूळ आराखड्यानुसारच नेण्यासाठी लढा देण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपल्या या मागणीचा पुनरुच्चार केला. २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर हा मार्ग सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरूनगरमार्गे पुण्याला नेण्याचा आराखडा मंजूर झाला. मात्र, आयत्या वेळी हा मार्ग शिर्डीवरून नेण्याचा द्राविडी प्राणायम राज्य सरकारने केला, असं आ. तांबे यांनी नमूद केलं.

हा मार्ग राज्य सरकारच्या महारेल या कंपनीद्वारे बांधण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेचीही त्यात भागीदारी असून मध्य रेल्वेला नाशिक आणि शिर्डीही या मार्गाला जोडायचं आहे. त्यामुळे सिन्नर, संगमनेर, पुणे हा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असल्याने तेथे बोगदे आणि पूल बांधायला जादा खर्च येणार असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे. त्यामुळे या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करून तो शिर्डीमागे वळवण्यात आल्याचं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं. मात्र, हे कारण सयुक्तिक नसून शिर्डीमार्गे ही रेल्वे गेल्यास या प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध असल्याची भूमिका आ. तांबे यांनी घेतली.

हा मार्ग हायस्पीड असून ताशी २०० ते २५० किमी वेगाने रेल्वे धावणार आहे. सध्या वंदे भारत या गाडीचा वेगही एवढा नाही. त्यामुळे हा प्रकल्प नाशिक, सिन्नर, संगमनेरसह अनेक तालुक्यांसाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे. पण सभागृहात प्रश्न मांडूनही तो सुटत नसेल, तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहातील मांडणी आणि आंदोलन यांची जोड मिळावी लागते. या प्रश्नाबाबतही तोडगा न निघाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे आ. सत्यजीत तांबे म्हणाले.

ML/KA/SL

4 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *