मंदिरांच्या भूमीवरील सर्व प्रकारचे शुल्क रद्द करा ! – मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई, दि २२- महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व मंदिरांच्या जमिनीवरील मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व इतर कर पूर्णपणे माफ करण्याची तसेच मंदिरांच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. तसेच बेलापूर येथे विभागीय कोकण आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. यावेळी ‘खारघरचा राजा’ श्री गणेश मंदिराचे श्री विजय पाटील व धर्मप्रेमी उपस्थित होते. नऊ मंदिरांच्या विश्वस्तांनीही या मागणीसाठी मंदिरांच्या वतीने पत्रे दिली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुख्यमंत्री यांनी या दोन्ही मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करून निवेदने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित सचिवांकडे पाठविली आहेत. तसेच ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया शासनाने प्रारंभलेली असल्याची माहिती आहे. या विषयाशी संबंधित महाराष्ट्रातील सुमारे १० जिल्ह्यांतून विविध जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आदींना या विषयीची निवेदने मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर विश्वस्तांनी दिली आहेत.
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, “ मंदिरे कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक, धार्मिक कार्य करीत असतात. अनेक श्रद्धाळू भक्त मंदिरांना जमिनी दान देतात. मंदिरांना समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक गरजांकरिता जमीन खरेदी करावी लागते. अशा जमिनींच्या हस्तांतरणावर आकारले जाणारे सद्यस्थितील मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, तसेच इतर शुल्क वा कर पूर्णपणे माफ करण्यात यावेत. यापूर्वी जमिनींच्या काही हस्तांतरण प्रकरणात अटी-शर्तींवर मुद्रांक शुल्कात अंशत: सूट देण्यात आलेली आहे; परंतु ती अत्यल्प आहे. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम नियम १९५० या संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.”KK/ML/MS