हरीश कपाडिया यांना ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

 हरीश कपाडिया यांना ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड के शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. राज्यातील किल्ले हे राज्याचे तसेच संस्कृतीचे रक्षक असून विशेषज्ञांच्या मदतीने त्यांचे रक्षण आणि जीर्णोद्धार केला पाहिजे तसेच तेथे शैक्षणिक पर्यटन वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ गिर्यारोहक आणि हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेला देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे आणि संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांबाबत वाचतो त्यावेळी मनाला वेदना होतात असे सांगून स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारस्याचे जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचे रक्षण होईल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर जातीभेदाचे कडवे विरोधक होते. त्यामुळे जातीभेद समाप्त करणे हीच त्यांना सच्ची श्रद्धांजली ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

हिमालयन जर्नलचे संपादक तथा ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी हिमालय पर्वत शृंखलेच्या केलेल्या अध्ययनाचा गौरव करून राज्यपालांनी त्यांचे ‘शिखर सावरकर जीवन गौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षी काही गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश येथे आजवर सर केले नाही असे शिखर सर केले होते. त्या शिखराला २०१८ साली ‘शिखर सावरकर’ हे नाव दिले गेले, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी दिली. सावरकर हे साहसाचे पुरस्कर्ते होते. गिर्यारोहण हे साहसी तसेच संघटनात्मक कार्य असल्यामुळे सावरकर स्मारकातर्फे गिर्यारोहकांना २०२० पासून ‘शिखर सावरकर’ पुरस्कार दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करीत असल्याचे यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेश वराडकर आणि स्वप्नील सावरकर उपस्थित होते.

ML/KA/SL

15 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *