बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बस गाड्या कायमस्वरूपी राखाव्यात
शशांक राव, बेस्ट वर्कर्स युनियन सरचिटणीस
मुंबई, दि ५
मुंबई महापालिकेच्या बेस्ट बस उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात या ११ जून २०१९ रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन केले गेले नाही.
२०१८नंतर एकही स्वमालकीची बेस्ट बस विकत घेतली नाही. त्यामुळे ७५ वर्षानंतर आजघडीला बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या केवळ २५१ बस गाड्या आहेत. सेवानिवृत कर्मचाऱ्यांची १ कोटींच्यावर ग्रॅच्युइटीची रक्कम पालिकेत थकीत आहे, असे आरोप बेस्ट वर्कर्स युनियचे सरचिटणीस शशांक राव यांनी मुंबई मराठी पत्रकार परिषद येथे केले. या विरोधात येत्या १० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला.
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित बेस्ट युनियनच्या मागण्यांवर बेस्ट प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष
आहे. सेवानिवृत कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देणे मिळालेले नाही. २०१० अगोदरपासून वेगवेगळ्या फंडांत ग्रॅच्युइटीचा पैसा ठेवला जात होता. पण तो आता कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरला जातो. निवृत्त १२ ते १५ लाख कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळालेली नाही. ही थकीत रक्कम १ हजार कोटींच्यावर आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीची रक्कम तातडीने दयावी, बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, विद्यूत पुरवठा विभागात २०१० व २०२४ मध्ये व नंतर कायम करण्यात आलेल्या हंगामी कामगारांना सुधारित वेतन निश्चित करावे, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.
युनियनच्या मागण्यासाठी कामगारांना वेढीस न धरता येत्या १० नोव्हेंबरपासून सकाळी ११ वाजता केनेडी ब्रीज येथील बेस्ट वर्कर्स युनियन कार्यालयात केवळ स्वतः बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत युनियनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.KK/ML/MS