कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण तर धानाला बोनस जाहीर

 कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण तर धानाला बोनस जाहीर

नागपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ३१ पैकी २६ जिल्ह्यात पूर्ण झाले असून त्यात ९ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे असं सांगत धान खरेदीसाठी यावर्षी प्रती हेक्टरी वीस हजार बोनस आणि कोकणासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली, त्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

दुष्काळ , अवकाळी आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल दोन्ही बाजूने उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या दीड वर्षात आमच्या सरकारने ४४,२७८ कोटींची मदत शेतकऱ्यांना विविध योजना आणि सवलती मधून दिली आहे, केंद्र सरकारकडे दुष्काळा साठी २,५८७ कोटींची मदत मागण्यात आली आहे, केंद्राकडून १५ पैकी ९ जिल्ह्यात पथक पाठवून पाहणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

उर्वरित दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या १०२१ महसूल मंडळात आवश्यक सर्व सवलती देण्यात येत आहेत, यासाठी १,८५१ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. अवकाळी नुकसानी साठी १,७५७ कोटींची मदत जाहीर केली असून ३०० कोटींची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे असं ते म्हणाले. दुष्काळ आणि अवकाळी साठी एकूण ४,४३८ कोटी रुपये मदत देत आहोत. एक रुपयात पीक विमा योजनेत एक कोटी सत्तर लाख खरीप आणि रब्बी साठी ६६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यासाठी ५,१७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, विमा कंपन्यांनी २,१२१ कोटींची रक्कम मंजूर केली आहे त्यापैकी १,२१७ कोटी रकमेचे अग्रिम वाटप झालं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

आतापर्यंत शेतकरी कर्ज माफी योजना , नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन रक्कम याबाबतचे आकडे देत सभागृहाला माहिती दिली. यावर्षी पाच लाख शेतकऱ्यांना लाभ होईल यासाठी धान खरेदीसाठी हेक्टरी वीस हजार बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय कोकणच्या सिंचन , मत्स्य , शेती , बागायत यासाठी स्वतंत्र कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा ही त्यांनी केली. त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

ML/KA/SL

18 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *