ज्वलज्वलंतेजस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक: स्वराज्यासाठी धर्म रक्षणाचा क्षण
मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) :
प्रत्येक मराठी, मराठीच काय, देशातला, स्वराज्याची आस असणारी प्रत्येक व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते, दैवत मानते. परकीय आक्रमकांच्या अत्याचाराच्या तमोयुगातून महाराष्ट्राला मुक्त करत, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श राजे म्हणून शिवरायांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. मात्र , छत्रपतींच्या नंतर, स्वराज्यावर आलेल्या संकटांचा समर्थपणे सामना करत, महाराष्ट्र धर्म जागृत ठेवणाऱ्या छत्रपती, धर्मवीर संभाजीराजे यांचेही आपल्यावर तेवढेच उपकार आहेत. तेजपुरुष, स्वराज्य रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी महाराजांनी त्यांच्या उणापुऱ्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात, स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी झुंज दिली. क्षात्रतेज जागवत महाराष्ट्राचा धर्म वाचवला.
छत्रपती शिवरायांचे निधन झालं त्यावेळी युवराज संभाजी राजे पन्हाळा गडावर कैद होते, त्याच वेळी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. मात्र, त्या कैदेतून स्वतःला सोडवून घेत, संभाजीराजे रायगडावर परत आले आणि तिथेच 16 जानेवारी 1681 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.
छत्रपतींचे अकाली झालेले निधन, स्वराज्यात माजलेली सुंदोपसुंदी, अंतर्गत राजकारण यामुळे हिंदवी स्वराज्य आता कमकुवत झालं आहे, असा स्वकियांचा आणि अर्थातच शत्रूचा ही समज झाला होता. अशा परिस्थितीत राज्याचा वारसा सांभाळायची जबाबदारी संभाजी महाराजांवर आली. अशावेळी संभाजी राजांचा राज्याभिषेक अनेकांना दिलासा तर औरंगजेबासारख्या शत्रूला संदेश देणारा होता.
स्वराज्य अस्थिर झालं असेल असं समजत, संभाजी महाराज गादीवर आल्यावर औरंगजेबाने लगेच रायगडावर स्वारी केली, मात्र मराठ्यांनी हा मोगल हल्ला परतवून लावला. स्वराज्याचा खजिना रिकामा झाला होता, तो भरून काढण्यासाठी, संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूर वर स्वारी करत, हे गाव लुटलं. त्यापाठोपाठ औरंगाबाद चा मोगल खजिनाही लुटला. ह्या यशस्वी आक्रमणामुळे, आपला सामना पुढेही सिंहाच्या छाव्याशी आहे, याची जाणीव औरंगजेबाला झाली. चिडलेल्या औरंगजेबाने, जोपर्यंत संभाजी महाराजांना नेस्तनाबूत करत नाही, तोपर्यंत पगडी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आणि आपलं जवळपास सगळं सैन्यदल घेऊन, स्वराज्यात येण्याचा निर्णय घेतला.
औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता, त्याचे सरदार वारंवार आक्रमण करत होते, आणि संभाजी महाराजांचे मावळे हा प्रत्येक हल्ला जिवाच्या आकांताने लढून परतवत होते. त्याला कुठेही विजय मिळत नव्हता. स्वतः संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत 100 पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि एकही पराभूत झले नाहीत. एकीकडे स्वराज्याची घडी पुन्हा नीट लावणे तर दुसरीकडे आलेली आक्रमणे परतवून लावणे ,यातच त्यांची नऊ वर्षांची राजवट गेली. केवळ मोगलच नाही, तर आदिलाशहाविरोधात कोकण मोहिम,बेळगाव आणि खानदेश मोहिम, मोघलां विरूद्ध बंगाल मोहीम, कर्नाटक मोहिम राबवून मोगल साम्राज्य कमकुवत केलं.
छ्त्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवत, संभाजी महाराजांनी गनिमी काव्याचा उत्तम वापर, वेगवान आणि अचूक हल्ले, शत्रूला चकमा देण्याच्या रणनीतींचा वापर केला.
ज्वलज्वलंतेजस म्हणजे दाहक तेज असलेलं व्यक्तित्व असं ज्यांचे वर्णन केलं जातं त्या संभाजी महाराजांनी, नऊ वर्षे ऑरंगजेबाला झुंजवत ठेवलं, पण स्वराज्याचा थोडाही भाग घेऊ दिला नाही. केवळ फंद फितुरीनेच ते पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारला तर अभय देऊ असं सांगितलं. संभाजी महाराज सिंहाचा छावा होते, त्यांनी हाल हाल सोसले, मरण पत्करले मात्र, स्वतःच्या आणि महाराष्ट्र धर्माचे रक्षण केलं. त्यांच्या ह्या दृढनिश्चयाने, त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा क्षात्र आणि धर्म तेज जागं झालं. त्या तेजातूनच, पुन्हा एकदा मराठा साम्राज्य उभे राहिले, आणि पार अटकेपार पोहोचला. त्या दृष्टीने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक महत्वाची घटना ठरली आहे.
ML/ML/PGB 16 Jan 2025