सलमान खान गोळीबार प्रकरणी दोन्ही आरोपींच्या आवळल्या मुसक्या

 सलमान खान गोळीबार प्रकरणी  दोन्ही आरोपींच्या आवळल्या मुसक्या

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की साहेब गुप्ता(24) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (21) अशी आरोपींची नावे असून ते दोघेही बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील रहिवासी आहेत.
या आरोपींना आज कोर्टात हजर केले असता 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे विक्की गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली. रविवारी (14 एप्रिल 2024) या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही फूटेज मध्ये आरोपींचा चेहराही समोर आला. तपासात सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर सलमानच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ मोटरसायकल सोडून निघून गेल्याचे आढळले. आरोपींनी त्या ठिकाणाहून रिक्षा करून वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. आरोपी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले पण सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. त्यानंतर तो मुंबईतून पळून गुजरातच्या भूजमध्ये लपले. अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मी गौतम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनी सलमान खान यांच्या घराबाहेर 5 गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर गुन्ह्यांसंबधी पोस्ट केली होती. पोलीस तपासात आरोपी गुजरातला पळून गेल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांची दोन पथक गुजरातला पाठवले असल्याचे लक्ष्मी गौतम यांनी सांगितले.

SW/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *