आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस: आता गरज डिजिटल आणि कौशल्य आधारित साक्षरतेची
मुंबई, दि. 8 (राधिका अघोर) :आज आठ सप्टेंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. समाजात शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा, शिक्षणाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने, 1966 साली संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर सगळया देशांमधे या निमित्त अनेक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. 90 चे दशक, आंतरराष्ट्रीय साक्षरता दशक म्हणून जाहीर करण्यात आले.
या दशकात, मागास, अविकसित देशामंधे साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. मात्र आता जगभरातले साक्षरतेचे चित्र बदलले आहे. जगभरातच साक्षरतेच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. भारतातही साक्षरतेची आकडेवारी 2011 ची आहे. त्यात सुद्धा देशात साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के इतके होते. आता तर ते नक्की वाढले असेल. शिक्षण विषयक अनेक योजनांमुळे भारतात आज बिहार सारख्या राज्यातही साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे.
मुलींना ही कुठलाही भेदभाव न होता, शिक्षण घेण्याचा अधिकार आणि अनेक सवलती मिळत आहेत. एकूण, साक्षरतेचा प्रचार प्रसार हा मुद्दा आता बऱ्यापैकी कालबाह्य ठरला आहे.
मग आता काळानुरूप बदललेल्या जगात आपण साक्षरतेच्या एक पाऊल पुढे जायला हवे. आज काळाची गरज नुसते पुस्तकी शिक्षण किंवा लिखाण वाचन एवढेच मर्यादित नाही, तर आता शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे. डिजीटल साक्षरता आज आवश्यक ठरली आहे. आता साक्षर लोकांना हे ज्ञान द्यायला हवं आहे.
आज जगभरात डिजिटल व्यवहार होत आहेत आणि भारत त्यात आघाडीवर आहे. त्यामुळे इथल्या गोरगरीबांना देखील मोबाईल, डिजिटल व्यवहार यांचं प्राथमिक ज्ञान असायला हवं. त्याशिवाय, पुस्तकी शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देणं हे ही अनिवार्य झालं आहे. केवळ पुस्तकी शिक्षण आजच्या काळात पुरेसं नाही, त्यामुळे शिक्षणाची व्याप्ती वाढवून त्यात लहानपणापासूनच कौशल्याचा अंतर्भाव करायला हवा. तरच आजच्या काळात ती खरी साक्षरता ठरेल.
त्याशिवाय, अक्षर ओळख इतकेच नाही, तर मूल्य शिक्षण ही देण्याची गरज आहे. नागरिकशास्त्र ह्या विषयाची व्याप्ती वाढवून सार्वजनिक ठिकाणी वर्तन कसं असावं हे शिकवण्याची गरज आहे. कारण आपल्याला केवळ शिक्षित नाही तर सुसंस्कृत समाज घडवायचा आहे. नागरी वर्तनाचे नियम पाळणारा समाज विकसित करायचा आहे. आज साक्षरता म्हणजे हे खरे मुद्दे आहेत.
केवळ पुस्तकी किंवा परीक्षार्थी घडवणारे शिक्षण देऊन कसा समाज निर्माण होतो, ते आपण आज बघतो आहोतच.
म्हणूनच, समाजाची ही दूरवस्था टाळायची असेल तर सुसंस्कृत साक्षरता ही देखील काळाची गरज आहे. आजच्या साक्षरतेच्या व्याख्येनुसार, हे बदल आपण केलेत तरच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाला काही अर्थ राहील. अर्थातच, साक्षर करावे अवघे जन हे मूळ काम सुरू राहणार आहेच !
सर्व सुसंस्कृत साक्षरांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या शुभेच्छा !
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस: आता गरज डिजिटल आणि कौशल्य आधारित साक्षरतेची
ML/ML/PGB 8 SEP 2024