सुरक्षित इंटरनेट दिन : तुम्ही इंटरनेट वापरा, इंटरनेट ला तुम्हाला वापरू देऊ नका.

-राधिका अघोर
अन्न, वस्त्र, निवारा सोबत आता इंटरनेट सेवा असलेला स्मार्ट फोन देखील मानवाची मूलभूत गरज झाला आहे. सगळ्या गोष्टी इंटरनेट मुळे हाताशी आल्या आहेत, मोबाईल मुळे त्या अधिक सुलभ झाल्या आहेत. न्यूजपेपर, टिव्ही, लॅपटॉप, कॅलक्युलेटर, दिनदर्शिका, पुस्तकं अशा अनेक गोष्टी आता एका मोबाईल मधे सामावल्या आहेत. ह्या मुळे आपलं जगणं सुखकर झालं आहे, यात काहीही दुमत नाही. मात्र आपण इंटरनेट आणि मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्याचे अनेक धोके, फसवणूक यांचाही आपल्याला सामना करावा लागतो आहे. कधीकधी ही फसवणूक आपले आयुष्यभराचे नुकसान करणारी ही असू शकते. म्हणूनच safer Internet day, म्हणजेच सुरक्षित इंटरनेट दिनानिमीत्त इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्याबद्दल जनजागृती केली जाते.
इंटरनेटचा वापर जेवढा वाढतो आहे, तेवढाच, त्याचा दुरुपयोग करून, फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. मोबाईल किंवा इंटरनेट चा वापर तर थांबवता येणार नाही, म्हणून हा वापर काळजीपूर्वक करणे हाच एक उपाय आहे आणि सुरक्षित वापर करण्याची गुरुकिल्ली, मोहाला कुलूप लावणे हीच आहे. आपण अत्यंत हलगर्जीपणे इंटरनेटचा वापर करतो. अगदी सोप्या सोप्या नियमांचे पालन करत नाही.
कोणत्याही कॉम्प्युटर, मोबाईल वरून आपला वैयक्तिक डेटा हाताळणे, काम झाल्यावर डेटा हिस्ट्री डिलीट न करणे, पासवर्ड सोपा ठेवणे, पासवर्ड सेव्ह करून ठेवणे, अशा चुका आपण करतो. कोणत्याही अनोळखी ॲप वर माहिती/डेटा भरणे यातून आपली वैयक्तिक माहिती किंवा मोबाईल हॅक केलं जाऊ शकेल, अशी परिस्थिती आपणच निर्माण करत असतो.ही सगळी काळजी घेण्यासाठी अगदी एक मिनिटही लागत नाही, मात्र आपल्या निष्काळजी वृत्तीमुळे आपण तेवढंही करत नाही. खरं तर आपण स्वतःच इंटरनेटचा सुरक्षित वापर करू शकतो.
त्याशिवाय, इंटरनेटचा वापर करूनच, बँकिंग फसवणूक, महिलांचे शोषण, विविध आमिषे दाखवून केलेली फसवणूक आणि अलीकडेच प्रसिद्ध झालेली सायबर अटकेची प्रकरणे अशा विविध घटना आपण आपल्या आजूबाजूला सर्रास बघत असतो, अनुभवत असतो. अशा सगळ्या वेळी आपलं डोकं स्थिर आणि शांत ठेवणे, कोणत्याही परिस्थितीत घाबरुन न जाता एकदम कुठलीही माहिती, पैसे शेअर न करणे, हे सतत डोक्यात ठेवायला हवं.
आजकाल मोबाईल आणि इंटरनेट स्वस्त, सहज उपलब्ध झाल्यामुळे लहान मुलांनाही ते मिळतं, मात्र इंटरनेट वर कसलीही बंधने नसल्यामुळे अडनिड्या कोवळ्या वयातही त्यांना नको त्या गोष्टी दिसतात. कुतूहल, आकर्षण कधी इतर मित्रांचं प्रेशर यामुळे ते त्यात गुरफटत जातात आणि कधी एखादा गेम, कधी चॅलेंज यामुळे ते धोकादायक गोष्टीही करतात. यात इंटरनेट किंवा मोबाईल चा काहीही दोष नसतो, दोष त्याच्या आहारी जाण्याचा, त्याचे गुलाम होण्याचा असतो. इंटरनेट ही एक सुविधा आहे आणि मोबाईल, लॅपटॉप ही त्या सुविधेची साधने, हे आपलं आयुष्य नाही, हे आधी आपण समजून घ्यायला हवं आणि आपल्या मुलांनाही समजावून सांगायला हवं.
मग इंटरनेट किंवा सोशल मिडियामुळे लहान मुलांवर होणारे परिणाम, त्यांचं शोषण टाळण्यासाठी ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी अल्पवयीन मुलांना सोशल मिडिया वापरण्यास बंदी घातली आहे. भारतात ही, पालकांच्या परवानगीशिवाय, अल्पवयीन मुलांना सोशल मिडिया वापरता येणार नाही, असा कायदा विचाराधीन आहे. अशा वेळी इंटरनेट चा सुरक्षित वापर त्यांना शिकवणे अत्यंत आवश्यक आहे.
आज आपली सगळी कामे इंटरनेट च्याच माध्यमातून आपण करत असतो. आणि आता तर ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ते सारखी साधनं वापरून आपल्या सवयी, आपल्या वागण्याचे पॅटर्न लक्षात घेतले जाऊन, आपले पासवर्ड सहज हॅक केले जाऊ शकतात. आपल्या आवाजाची कॉपी करून, आपल्या मोबाईल मधून कोणालाही आपल्या आवाजात मेसेज पाठवले जाऊ शकतात.
आपले व्हॉट्सअँप हॅक केले जाऊ शकते. हे सगळं टाळण्यासाठी आपले पासवर्ड सतत बदलत राहणे, आपले devises सोडता इतर कुठूनही ते पासवर्ड न वापरणे, पासवर्ड कठीण ठेवणे, अशा गोष्टी करायला हव्यात.
त्यातूनही जर असे फोन किंवा मेसेजेस आलेच तर alert आणि शांत राहायला हवं. आपली माहिती कुठेही कोणासोबतच ही शेअर करू नये. तरच, इंटरनेट सुरक्षित राहील.
हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की इंटरनेट स्वतः काही करत नाही, ते वाईट किंवा चांगलं नाही, आपण त्याचा वापर कसा करतो, यावर अवलंबून आहे. इंटरनेट ने आपले आयुष्य सुखकर बनवले आहे, भविष्यात ते आणखी सुखकर होत जाणार आहे. म्हणूनच त्याचा वापर आता अपरिहार्य आहे, मात्र तो वापर सुरक्षित असणे आवश्यक आहे. आणि ते सर्वस्वी आपल्याच हातात आहे.