तेरणा नदी वाहती झाली;अनेक नदी नाले ओढ्यांत वाहू लागले पाणी…
धाराशिव, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मागील काहीं दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 12 जून पर्यंत सरासरी 123.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 11 जून रोजी सकाळपर्यंत एकूण आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात धाराशिव तालुक्यातील ढोकी जागजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा आणि ईटकळ कळंब तालुक्यातील शिराढोण आणि गोविंदपुर ,उमरगा तालुक्यातील नारंगवाडी आणि मुळज या आठ महसूल मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस मागील 24 तासात झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढे वाहू लागले असून जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यातील तेरणासह अनेक नद्या वाहत्या झाल्या असून यामुळे जिल्ह्यावरील पिण्याच्या पाण्याचे संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात 99.6 तुळजापूर 150 मिलिमीटर परंडा 101.1 भूम 119.7 कळंब 110मिलिमीटर उमरगा 164.6 लोहारा 106.3 वाशी 138.9 असा सर्व मिळून सरासरी 123.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्याच काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लवकरच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे .मागील सहा सात दिवसापासून जिल्ह्यातील जवळपास 40 महसूल मंडळात 65 मिलिमीटर च्या पुढे पाऊस झाला आहे, त्यामुळे आता शेतकरी खरिपाच्या पेरण्याच्या तयारीला लागले आहेत.
ML/ML/SL
11 June 2024