कोकणातील जनतेसाठी रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” Remedy Nova Solutions Kit उपलब्ध करुन देणार आहेत.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रामध्ये हे अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी कुडाळ येथील माणगावं प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तसेच ५ नोव्हेंबर दुपारी ०३ वाजता सावंतवाडी मधील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुविधा केंद्र येथे होणार आहे.
न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनी प्रथमच महाराष्ट्रात टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ‘हेल्थ किट’ वापरणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. या यंत्रणेचा फायदा जिल्हायातील गोरगरीब जनतेला होणार असून लवकरच शासनाच्या माध्यमातून जिल्हयातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. शासकीय स्तरावर अशा प्रकारची यंत्रणा बसवणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. यापूर्वी संस्थास्तरावर पुणे व नंदुरबार येथे ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा या राज्यांमध्ये ही यंत्रणा आणि हेल्थ केअर किट कार्यरत आहे.
“रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” असे या अत्याधुनिक हेल्थ केअर किटचे नाव असून या किटमध्ये बॉडी टेंप्रेचर, ब्लडप्रेशर, इसीजी तपासणी, पल्स ठोके, फुफ्फुसांची क्षमता, हृदयाचे ठोके, ग्लुकोज, कॉलेस्ट्रॉल तपासण्या, प्रेग्नन्सी टेस्ट, मलेरिया, डेंग्यूसारख्या रॅपीड टेस्ट व तब्बल दहा प्रकारच्या युरिन टेस्ट ह्या चाचण्या करण्याची क्षमता आहे. त्यासाठी या किटमध्ये डिजिटल स्टेथेस्कोप, ब्लडप्रेशर मिटर, बॉडी टेंप्रेचर मिटर, ऑक्सिमिटर, स्पायरो मिटर, इसीजी रिडर, ऑप्टिकल रिडर, लिपिड केअरसारखी अत्याधुनिक डिजिटल उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या किटसोबत काँम्पूटर मॉनिटर, स्कॅनर, प्रिंटर व नेट सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे किट हाताळण्यासाठी एका परिचारिकेला विशेष ट्रेनिंग दिले जाणार आहे.
सुरुवातीला हे किट ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असले, तरी गरज पडल्यास दुर्गम गावांमध्ये अॅम्बुलन्समधून हे किट व टेक्निशियन पाठवून तेथील गरजू रुग्णांच्या आवश्यकतेनुसार वरील सर्वच्या सर्व तपासण्या मोफत करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे ग्रामीण वा दुर्गम भागातील जनतेला आरोग्य तपासणीच्या दृष्टीने विशेष तपासणी करण्यासाठी आर्थिक झळ सोसून शहरात जाण्याची गरज पडणार नाही.
सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील गरजू जनतेला वैदयकीय चाचण्यांची सुविधा मोफत व तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरुन गरजू रुग्णांना मिळणारे उपचार अधिक जलदगतीने होण्यास त्याची मदत होईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर व संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे माजी विद्यार्थी आहेत. समीर हे अशोका फेलो देखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे.
कंपनीने “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) ह्यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” विकसित केले आहे.
न्यूरोसिनॅप्टीक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नोलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खाजगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कंपनी तर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रात सदर सुविधा स्थापन करुन दिलेली आहे.Remedy Solutions Health Care facility for the people of Konkan
न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त आहेत ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा “टेक्नॉलॉजी पायोनियर”, नॅसकॉम फाउंडेशनचा “ज्यूरीज स्पेशल चॉईस” आणि नुकताच मिळालेला ” रेड हॅरींग ग्लोबल टॉप १०० कंपनीज” असे प्रतिष्ठित पुरस्कार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टीक ही एकमेव भारतीय कंपनी आहे जीचा गौरव “टाईम मॅगझिन”ने केला आहे.
माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम ह्यांनी उदघाटन करून राष्ट्राला समर्पित केलेले हे “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” आता महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अतिशय सोयीचे आणि लाभदायक ठरणार आहे असे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
ML/KA/PGB
3 Nov .2022