#भारतीय रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरु; मुख्य व्याज दरात वाढ होण्याची अपेक्षा नाही

 #भारतीय रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरु; मुख्य व्याज दरात वाढ होण्याची अपेक्षा नाही

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत यावेळीही मुख्य व्याज दरात (main interest rate) वाढ होण्याची अपेक्षा नाही. बुधवारी तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. जो कोणताही निर्णय होईल तो शुक्रवारी 5 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. एमपीसीची बैठक नेहमीच महत्वाची असते, यात निश्चित करण्यात आलेल्या मुख्य व्याज दराच्या आधारे सर्व बँका आणि वित्तीय संस्थांच्या ठेवी आणि कर्जाचे दर निश्चित केले जातात. परंतु यावेळची बैठक यासाठीही महत्त्वाची आहे की ती अर्थसंकल्पानंतर लगेचच होत आहे. म्हणुनच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikant Das) अर्थसंकल्पावरही काही प्रतिक्रिया देऊ शकतात.
एमपीसीमध्ये 6 सदस्य असतात. 3 सरकारचे प्रतिनिधी असतात आणि 3 सदस्य आरबीआयचे प्रतिनिधीत्व करतात, ज्यात गव्हर्नर शक्तिकांत दास यांचाही समावेश आहे. सरकारच्या प्रतिनिधींमध्ये अशिमा गोयल, जयंत आर वर्मा आणि शशांक भिडे यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, एमपीसीच्या बैठकीत मुख्य व्याजदरामध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. सोमवारी सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा निर्णयावर परिणाम होऊ शकतो. अर्थसंकल्पाविषयीच्या शक्तीकांत दास यांच्या प्रतिक्रियेवर विश्लेषकांची नजर असणार आहे.
सध्या आरबीआयचा रेपो दर (Repo rate) 4 टक्के आहे जो ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी आहे. यापूर्वी हा दर 22 मे रोजी बदलण्यात आला होता. हा बदल एमपीसीच्या बैठकीशिवायच करण्यात आला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत आरबीआयने रेपो दरात एकूण 1.15 टक्क्यांची कपात केली आहे. इंडिया रेटींग्ज अँड रिसर्च (India Ratings and Research) चे प्रधान अर्थशास्त्रज्ञ (Principal Economist) आणि पब्लिक फायनान्सचे संचालक (Director Public Finance) सुनील कुमार सिन्हा यांनी सांगितले की, आर्थिक विकास अधिक महत्वाचा आहे, त्यामुळे रेपो दर वाढविला जाणे अपेक्षित नाही. महागाई देखील कमी झाली आहे.
डिसेंबर 2020 च्या सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर (Inflation rate) कमी होऊन 4.59 टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 6.93 होता. किरकोळ महागाई दराच्या आधारेच आरबीआय आपला मुख्य व्याज दर निश्चित करते. सध्या 5 ऑगस्ट 2016 ते 31 मार्च 2021 पर्यंत किरकोळ महागाई दर सरासरी 4 टक्के (2 टक्क्यांच्या चढ-उतारांच्या अपेक्षेसह) ठेवण्याची जबाबदारी आरबीआयने स्वीकारली आहे.
Tag-RBI/MPC/meeting
PL/KA/PL/4 FEB 2021

mmc

Related post