#भारतीय रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सला ठोठावला अडीच कोटी रुपयांचा दंड

 #भारतीय रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सला ठोठावला अडीच कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्य़ूज नेटवर्क): नियामक निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बिगर-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्स (एनबीएफसी बजाज फायनान्स) वर 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कंपनी विरोधात वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्याच्या ग्राहकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. इतकेच नाही तर कंपनीच्या विरोधात निष्पक्ष व्यवहार संहितेचे (एफपीसी) उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा परिस्थितीत नियामक निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की पुणे येथील बजाज फायनान्सने आरबीआयने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने सर्व एनबीएफसींसाठी लागू करण्यात आलेल्या निष्पक्ष व्यवहार संहितेकडे देखील दुर्लक्ष केले. केंद्रिय बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 (RBI Act] 1934) च्या कलम 58G चे पोट-कलम 1 च्या नियम (बी) ला कलम 58B बी च्या पोट-कलम-5 च्या नियम ए ए सह जोडल्यानंतर मिळालेल्या अधिकारा अंतर्गत बजाज फायनान्स विरुद्ध ही कारवाई केली. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कंपनी, त्यांचे वसुली प्रतिनिधी जेव्हा ग्राहकांकडून पैसे वसुल करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना त्रास दिला जाणार नाही हे सुनिश्चित करू शकली नाही.
आरबीआयने दंड लावण्यापूर्वी बजाज फायनान्सला कारणे दाखवा नोटीस पाठवून, नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कंपनी विरोधात दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. यावर मिळालेल्या उत्तरानंतर केंद्रीय बँकेने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने सांगितले की ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित आहे. तसेच दंड कारवाईचा कंपनीकडून आपल्या ग्राहकांसोबत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर शंका घेण्याचा कोणताही हेतू नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
Tag-RBI/Bajaj Finance/Fine
PL/KA/PL/6 JAN 2021

mmc

Related post