वर्षा बंगल्यावर रक्षाबंधनाचा सण साजरा
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून १ कोटी ४० लाख अर्ज आले. त्यातील पात्र झालेल्या १ कोटी ४ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही त्या अडचणी दूर करून त्यांनाही निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित महिलांशी संवाद साधला. जनतेच्या आशिर्वादाने सरकारची ताकद वाढेल. राज्याची आर्थिक ताकद वाढत जाईल तसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निधीची रक्कम वाढविण्याचा मानस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उमेद अभियानातील महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ML/ML/SL
19 August 2024