आर्थिक निकषावर आरक्षण हीच माझी भूमिका…
छ संभाजीनगर दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्रात जातींच्या नावाने सगळा चिखल करून ठेवला आहे, असा महाराष्ट्र याआधी आपण कधी पाहिला होता का असा सवाल करीत कोणतेही आरक्षण आर्थिक निकषानुसारच दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका पूर्वीही होती पुढेही तीच राहील असे ठाम मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी दौरा आटोपता घेतला नाही केवळ मी जे मुक्काम करणार होतो ते केले नाही, यामुळे दौरा लवकर पूर्ण झाला, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या दौऱ्यात मी मनोज जरांगे पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात धाराशिव आणि बीड मध्ये घोषणाबाजी केली. यात काही पत्रकारांचा समावेश होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी जातीचे राजकारण करत आहेत.
शरद पवार यांनी राज्यात जातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सुरू केले. लहान मुले जातीवर बोलत आहे, राज्यात सर्व चिखल करून ठेवला आहे. शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या असताना अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस वक्तव्य करतो की महाराष्ट्राचा मणिपूर होईल? या लोकांनी मणिपूर होऊ नये याची चिंता करायला हवी ते न करता यांच्या डोक्यात काय सुरु आहे याची या वक्तव्यावरुन कल्पना येते. पुढील तीन साडे तीन महिन्यात हे दंगली घडवून आणतील असा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारा होता, मात्र आजचा असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाही त्यांनी कधीही तसं वक्तव्यही केलं नाही असं कौतुक राज ठाकरे यांनी केले. २००६ साली मनसे पक्ष स्थापनेपासून आमची भूमिका एकच आहे, आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे.ही भूमिका आम्ही नेहमीच मांडली आहे. आपल्या जातीबद्दल सर्वांनाच प्रेम असते, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याच काम हे राजकारणी करतायेत ही जखम न भरणारी असुन महाराष्ट्रातील जनतेने या जातीय राजकारणात पडू नये अस आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
दरम्यान या राजकीय लोकांनी माझ्या नादी लागू नये अन्यथा निवडणुकांत मनसे कार्यकर्ते यांना महाराष्ट्रात एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.राज्यात ६० टक्क्यांवर रिक्षाचालक इतर राज्यातील आहेत. जर तो रोजगार आपल्या मुलांना मिळाला असता तर १ कोटी मुलांना रोजगार मिळाला असता, मात्र आपले सरकार तरुणांना योग्य माहिती देत नाही असे राज ठाकरेंनी सांगितले.
लोकसभेत आपण महायुतीला पाठींबा दिला मात्र विधानसभा स्वबळावर असे का ? यावर बोलताना महायुती मधे तीन घटक पक्ष असून यांच्या जागावाटपात चौथ्या पक्षाला किती जागा मिळतील ? असे म्हणत त्यांनी विधानसभा निवडणूकीत महायुतीमध्ये जाणार नाही असे वक्तव्य केले आहे.
ML/ML/SL
10 Aug 2024