ट्रेनमध्ये टॉयलेट दुर्गंधी घालवण्यासाठी रेल्वे वापरणार आधुनिक तंत्रज्ञान

 ट्रेनमध्ये टॉयलेट दुर्गंधी घालवण्यासाठी रेल्वे वापरणार आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दररोज लाखो प्रवाशांना वाहून नेणारी भारतीय रेल्वे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वेतील स्वच्छतेला प्रामुख्याने महत्त्व दिले जात आहे. ट्रेनमधील अस्वच्छ शौचालयांची समस्या सोडवण्यासाठी भारतीय रेल्वे IOT तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. रेल्वेकडून सांगण्यात आले की, ते इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) तंत्रज्ञान, नवीन रसायने आणि प्रमाणित वॉटरिंग सिस्टम वापरून ट्रेनचे शौचालय स्वच्छ आणि चांगले बनवण्याचा विचार करत आहेत.

Rail Madad ॲपवर आलेल्या अनेक तक्रारींमध्ये ट्रेनमधील दुर्गंधीच्या समस्येचा समावेश आहे. या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वे बोर्डाने दुर्गंधी शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याची शिफारस केली आहे. या तंत्रज्ञानासाठी व्हिलिसो टेक्नॉलॉजीज या मुंबईतील दुर्गंधी निरीक्षण कंपनीची निवड करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, हे नवीन तंत्रज्ञान किती प्रभावी आहे आणि ट्रेनमध्ये साफसफाईची यंत्रणा कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी, काही लिंके हॉफमन बुश आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी कोचमध्ये हे तंत्रज्ञान सुरु केले जाईल. नवीन प्रीमियम ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनमध्येही हे तंत्रज्ञान लागू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, वंदे भारत ट्रेनच्या एसी फर्स्ट क्लास डब्यांमध्ये गरम पाण्याचे शॉवरही असतील. बीईएमएल कंपनीद्वारे तयार करण्यात येत असलेल्या स्लीपर वंदे भारत गाड्यांमध्ये दुर्गंधीरहित शौचालय व्यवस्था असेल, जी वापरण्यास अतिशय सोयीची असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

नवीन तंत्रज्ञान आणि चांगल्या डिझाइनचा अवलंब करण्यासोबतच, रेल्वे साफसफाईच्या जुन्या पद्धती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, रेल्वे बोर्डाने अलीकडेच त्यांच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून त्यांना ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि ऑफिसमधील शौचालये स्वच्छ करण्यासाठी क्लोनॉन कॉन्सेन्ट्रेट नावाच्या उत्पादनाची चाचणी घेण्याचा सल्ला दिला आहे. हे उत्पादन बनवणारी पुण्यातील डिंपल केमिकल्स अँड सर्व्हिसेस कंपनीचा दावा आहे की, हे नवीन रसायन घाण निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे दुर्गंधी येत नाही.

SL/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *